पाकिस्तानला मोठा दणका! भारताविरोधात निर्णय घेणं चांगलंच भोवलं!
Tv9 Marathi August 10, 2025 09:45 PM

Pakistan Vs India : पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तावर कठोर निर्बंध लागू केले. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास मज्जाव केला. पहलगामवरील हल्ल्याला आता बरेच महिने झाले आहेत. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्ताननेही भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. या निर्णयांतर्गत पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. कारण पाकिस्तानला या निर्णयामुळे तब्बल 127 कोटींचा तोटा झाला आहे.

127 कोटींवर सोडावे लागले पाणी

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करणे चांगलेच महागात पडले आहे. पाकिस्तानने भारताच्या विमामांना त्यांच्या हद्दीत प्रवेश न दिल्याने तब्बल 127 कोटींचे नुकसान झाले आहे. भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता.

रोज 100 पेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित

पाकिस्तानने भारतविरोधी घेतलेल्या या निर्णयांचा नेमका काय परिणाम झाला? याची माहिती पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत दिली. या माहितीनुसार पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केल्यामुळे रोज 100 पेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित झाले. त्याचाच परिणाम म्हणून 24 एप्रिल ते 30 जून या काळात 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (साधारण 127 कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे.

….तरी पाकिस्तान म्हणतो आमचा तोटा झालाच नाही

पाकिस्तानने याआधीही अनेकदा आपला एअरस्पेस बंद केलेला आहे. मात्र पाकिस्तानी एअरपोर्ट्स अथॉरिटीच्या सांगण्यांनुसार पाकिस्तानने भारातसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलेले असले तरी त्यांच्या एकूण नफ्यात वाढ झालेली आहे. 2019 साली पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाचे एकूण उत्पन्न 508000 डॉलर्स होते. आता ते वाढून साली 760000 डॉलर्स झाले आहे. 2019 साली पाकिस्तानी हद्दीतून जाणाऱ्या विमानांमुळे पाकिस्तानला रोज 4.24 कोटी रुपयांची कमाई व्हायची. आता 2025 साली या कमाईत 6.32 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे पाकिस्तानचे मत आहे. त्यामुळेच आम्ही भारतासाठी आमचे हवाई क्षेत्र बंद केलेले असले तरी आमच्या उत्पन्नात घट झालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.