'राखी'च्या नात्यापलीकडचा प्रेमाचा बंध! बहिणीने भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची किडनी केली दान, अनोख्या 'रक्षाबंधन'ची चर्चा
esakal August 10, 2025 02:45 PM

मुंबई : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे फक्त राखी बांधून मिठाई खाण्याचा दिवस नाही, तर तो आहे प्रेम, विश्वास, त्याग आणि नात्यातील अतूट बंध दृढ करण्याचा सण. या वर्षीच्या रक्षाबंधनाने एका बहिणीने आपल्या भावासाठी केलेल्या प्रेम आणि त्यागाच्या कहाणीला अनोखी ओळख दिली आहे.

ही कहाणी आहे शीतल वाळके यांची. त्या यंदा आपल्या लाडक्या भावाला म्हणजे प्रवीण मानकर (वय ४६) यांना राखी बांधायला त्याच्यासोबत बसू शकणार नाहीत. कारण, काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या भावाचे जीवन वाचवण्यासाठी स्वतःची एक किडनी (Kidney Failure) त्याला दान केली आहे.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

प्रवीण यांना अचानक मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी (Doctor) तातडीने किडनी प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले. घरात चर्चा सुरू झाली, कोण पुढे येईल? पत्नीने तयारी दाखवली, पण वैद्यकीय कारणांनी ती पात्र ठरली नाही. अशावेळी, लहान बहीण शीतलने क्षणाचाही विलंब न करता ठाम निर्णय घेतला. 'मी देईन माझी किडनी!' रक्तगट जुळला आणि १५ मे रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

प्रवीण यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले, 'तिने मला दुसरा जन्म दिला आहे. बहिणीची राखी आता माझ्या आयुष्याच्या श्वासांमध्ये गुंफली गेली आहे.' मात्र, अनेक वर्षांनंतर यंदा ते रक्षाबंधन एकत्र साजरे करू शकणार नाहीत. कारण, प्रवीण यांना शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काही काळ मुंबईत राहावे लागणार आहे, तर शीतल अमरावतीला परतल्या आहेत.

Raksha Bandhan 2025 do’s and don’ts: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने काय करावं अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

मूत्रविकार तज्ज्ञ म्हणाले, 'किडनी दान करणे ही फक्त वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर त्यासाठी अफाट मानसिक व भावनिक तयारी लागते. शीतल यांचे कार्य प्रेरणादायी आहे.' आजवर आम्ही एकही राखी पौर्णिमा चुकवली नाही. यंदा मात्र आपण व्हिडिओ कॉलवर हा उत्सव साजरा करू. पण, मला माझ्या भावाला जीवन देण्याचा अभिमान आहे. हीच माझी खरी राखी आहे, असे शीतल म्हणाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.