गणेशोत्सवात सूचनांचे पालन करा
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वसई, ता. १० (बातमीदार) ः गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आहे, मात्र या उत्सवात न्यायालय आणि शासनाकडून प्राप्त मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने नागरिकांना केले आहे. पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी वसईत नागरिकांना मार्गदर्शन केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने ड्रीम एरिना, स्टेला वसई-पश्चिम येथे सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ पूर्वनियोजन बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी पोलिस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सुभाष बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील जयभाये, बजरंग देसाई, उमेश माने पाटील, नवनाथ घोगरे, वसई-विरार महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, महावितरण व अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, रस्ते दुरुस्ती, बेकायदेशीर पार्किंग व फेरीवाल्यांवरील नियंत्रण, मातीच्या मूर्तींचा प्रसार, पीओपी मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी उपाय, सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक संदेश पोहोचवणे, तलाव सफाई, छोट्या मूर्तींसाठी रो-रो सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षेची काळजी व नागरिकांना सोयीस्कर सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्नेहा दुबे पंडित यांनी सविस्तर चर्चा केली, तर या बैठकीमध्ये उपस्थितांनी निदर्शनास आणून दिलेल्या अडचणींबाबत पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
फोटोओळ
वसई : पोलिस आयुक्त निकेत कौशिक मार्गदर्शन करताना