पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, चावा घेताच मोठ्या खेळाडूसह दोघांचा मृत्यू, लोकांत भीतीचं वातावरण!
Tv9 Marathi August 11, 2025 09:45 AM

Mad Dog Bite : कुत्र्‍यांचा वाढता उपद्रव ही आजघडीला मोठी समस्या बनली आहे. जागोजागी तुम्हाला कुत्रे दिसतील. विशेष म्हणजे यातील काही कुत्रे हे हिंस्त्र असतात. त्यांना कोणताही त्रास दिलेला नसला तरी ते माणसांवर हल्ले करतात. नागरिकांकडून अनेकदा अशा भटक्या कुत्र्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाते. तरीदेखील या भटक्या कुत्र्‍यांचा उपद्रव काही कमी होताना दिसत नाही. दरम्यांना आता सर्वांनाच हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्‍याने चावा घेतल्याने दोघांचा तडफडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये एक राष्ट्रीय स्तरावरचा पॅरा-अॅथेलिटदेखील होता. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ओडिशा राज्यातील बोलांगीर जिल्ह्यातील चिनचेरा गावातील आहे. येते एका पिसाळलेल्या कुत्र्‍यामुळे दोन लोकांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावच सुन्न झाले आहे. मृतांमध्ये 33 वर्षीय योगेंद्र छत्रिया नावाच्या राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अॅथेलिटचा समावेश आहे. हृषिकेस राणा असे मृत्यू झालेल्या 48 वर्षीय अन्य व्यक्तीचे नाव आहे. या दोघांचाही शनिवारी रात्री उशिरा बुर्ला येथील विमसार वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुत्र्‍याने कशा पद्धतीने चावा घेतला?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जुलै रोजी चिनचेरा गावात एक पिसाळलेला कुत्रा घुसला होता. त्या दिवशी त्याने एकूण सहा जणांचा चावा घेतला. समोर जी व्यक्ती दिसेल, त्याला हा कुत्रा चावत सुटला होता. काही लोक त्याच्या हल्ल्यातून बचावले. मात्र एकूण सहा जणांना चावा घेण्यात तो पिसाळलेला कुत्रा यशस्वी ठरला. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांवरही या कुत्र्‍याने हल्ला करून चावा घेण्याचा प्रयत्न केला होता.

चार जणांचा जीव बचावला, दोघांचा मृत्यू

दरम्यान, कुत्र्‍याने चावा घेतलेल्या सहा जणांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चार जणांचा सुदैवाने जीव वाचला. परंतू ऋषिकेश आणि योगेंद्र यांची प्रकृती ढासाळतच गेली. त्यांचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांना अटोकाट प्रयत्न केला. मात्र उपचारांना साथ न दिल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. योगेंद्र छत्रिया यांनी फ्लोरबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे या पिसाळलेल्या कुत्र्‍याचा शोध घेतला जात असून लवकरच त्याला पकडण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.