देवळा: खडकतळे (ता. देवळा) येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली इयत्ता नववीतील विद्यार्थिनी पल्लवी समाधान पगार (वय १४) हिचा मृतदेह राखी पौर्णिमेला शनिवारी (ता. ९) घराशेजारील विहिरीत आढळून आला. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला होता. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांनी समजूत काढल्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले.
पल्लवी समाधान पगार ही गुरुवारी (ता. ७) घरातून कुणालाही काही न सांगता बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला. ती मिळून न आल्याने देवळा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी पल्लवीचे आजोबा दामू पगार शेतात गेले असता, घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या वेळी मिळालेल्या ‘सुसाइड नोट’मध्ये तिने स्वतःच्या भावना व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांनी तपासात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Chh.Sambhajinagar: फुलंब्रीत बसचालकाच्या सतर्कतेमुळे ५७ प्रवासी बचावलेरात्री उशिरा पल्लवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. राखी पौर्णिमेला भावाला राखी बांधणारी बहीण गमावल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.