शिरगाव, ता. १० : गोडुंब्रे येथील एका गोशाळेत बिबट्याचा हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला. तर, दोन वासरे जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रेमचंद बोरा यांच्या गोशाळेत पहाटे ही घटना घडली.
गोशाळेत जनावरांची काळजी घेण्यासाठी असलेले गणेश अडागळे यांना रात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्याने त्यांनी उठून जनावरांच्या गोठ्यात पाहिले असता बिबट्याने वासराला पकडले असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ लोखंडी रॉड घेऊन पत्र्याला वाजवून मोठ्याने आवाज केला. त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल एम. एस. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक वाय. एस. कोकाटे व अजित ओव्हाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला. बिबट्याला शोधण्यासाठी टॅप कॅमेरे लावण्यात आले. तसेच, पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने जखमी वासरांवर उपचार सुरू केले आहेत. या घटनेमुळे गोडुंब्रे व परिसरातील शेतकरी चिंतेत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘‘परिसरात बिबट्याचे अनेक नागरिकांना दर्शन झाले असून, वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे.
- किशोर सावंत, ग्रामस्थ, गोडुंब्रे
‘‘गोडुंब्रे येथे बिबट सदृश्य वन्य प्राण्यांनी हल्ला करून वासरांना मृत्युमुखी पाडल्याची माहिती मिळताच तत्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून परिसरात टॅप कॅमेरे लावण्याचे काम केले आहे. तसेच पंचनामा करण्यात आला आहे.
- वाय. एस. कोकाटे, वनरक्षक, बेबडओहोळ परिक्षेत्र
---