तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ६२० शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उद्या (सोमवारी) ८९ कोटी ८५ लाखांची भरपाई वितरित होणार आहे. राजस्थानमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वग केली जाणार आहे.
राज्य सरकारकडे पीकविम्याचा विमा कंपनीला द्यायचा हिस्सा प्रलंबित होता. त्यामुळे २०२२ पासून बाधित शेतकऱ्यांना पीकविम्यातून भरपाई मिळालेली नव्हती. आता जुलैअखेर राज्य सरकारने विमा कंपनीला एक हजार २४ कोटी रुपये दिल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राजस्थानमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून तेथून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील २०२४ या वर्षातील खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ४८ हजार ९३९ असून त्यांना पीकविम्याचे ७१ कोटी चार लाख रुपये आणि रब्बी हंगामातील १६ हजार ६८१ शेतकऱ्यांना १८ कोटी ८१ लाख रुपये मिळणार आहेत. पण, एक हजार रुपयांपेक्षा कमी पीकविमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे काही दिवसांनी भरपाईची रक्कम मिळेल. एक हजार रुपयाला कमी असलेली रक्कम राज्य सरकार त्यात घालून ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.
‘डीबीटी’द्वारे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार भरपाई
२०२४ या वर्षातील रब्बी व खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या जिल्ह्यातील ६५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना उद्या (सोमवारी) पिकांची भरपाई मिळणार आहे. ‘डीबीटी’द्वारे ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार आहे.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
भरपाईची रक्कम बॅंकांनी कर्जात वर्ग करू नये
अतिवृष्टी, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची पीकविम्याची भरपाई सोमवारी (ता. ११) वितरित होणार आहे. आपत्तीत सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना मिळणारी मदतीची रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.