पहिल्या हस्ताक्षर संग्रहालयाचा ध्यास अजून अपूर्णच
esakal August 11, 2025 07:45 PM

मच्छिंद्र कदम ः सकाळ वृत्तसेवा

चिंचवड, ता.१० ः सध्याच्या आधुनिक संगणक आणि मोबाईलच्या वेगवान युगामध्ये हस्ताक्षरांचे महत्व कमी होत चालले आहे. तरी हस्ताक्षर हे व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे, असा ठाम विश्वास ठेवून गेल्या चार दशकांपासून सुंदर अक्षरांसाठी आजीवन साधना करणाऱ्या चिंचवडगाव येथील हस्ताक्षर सुधार व सुलेखनकार नागराज मल्लशेट्टी यांचे पहिले हस्ताक्षर संग्रहालय उभारण्याचा ध्यास अजून अपूर्णच राहिला आहे.
नागराज मलशेट्टी (वय ५७) हे मूळचे कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील गारगोटीचे. शालेय जीवनात वडील काशिनाथ मलशेट्टी आणि जवाहर बाल भवनच्या तत्कालीन मुख्याध्यापिका प्रेमला घोडगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी १९७२ मध्ये हस्ताक्षर सुधारण्यास प्रयत्न सुरू केले. तेव्हापासून त्यांची अखंडपणे ‘अक्षर यात्रा’ सुरू आहे. राज्यामधील सुमारे ३०० शाळांमधील एकूण ३ लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा आयोजित केल्या. पोस्ट कार्डावर सुक्ष्म अक्षरांत ८२ हजार १७८ वेळा ‘राम’ लिहिण्याची विस्मयकारक कामगिरी केली. त्यांनी आतापर्यंत सुमारे १८ शहरांमध्ये हस्ताक्षर सुधार व लिपी विषयक माहिती प्रदर्शन आणि स्पर्धांचे सातत्याने आयोजन केले आहे.
दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर, जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून वि.वा.शिरवाडकर, प्रा.वसंत कानेटकर, पु.ल.देशपांडे आदी विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांची हस्ताक्षरे तसेच देश-विदेशांतील असंख्य प्रकारच्या प्राचीन लिपी आणि त्यांचा इतिहास, हस्ताक्षर सुधार विषयक माहिती, सुलेखन, लेखन साहित्याचा इतिहास आदींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. हा सर्व खजिना हस्ताक्षर संग्रहालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बारामती अथवा पुण्यात हे संग्रहालय उभारण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, जागेअभावी त्यांचा ध्यास सुमारे १७ वर्षांपासून अपूर्णच आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन कोल्हापूर ‘व्होकशनल अवॉर्ड’, ए. एस. प्रकाशन युवा गौरव पुरस्कार, लायन्स क्लब, आकुर्डी शिक्षक सन्मान पुरस्कार अशा सुमारे २० पेक्षा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

सुंदर, टपोरे आणि शुद्ध अक्षर हेच विद्यार्थ्यांचे खरे भूषण आहे. ही फक्त लेखनकला नसून अंतरीची सुंदरता प्रकट करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. माझ्याकडील हस्ताक्षरांचा खजिना संग्रहालयाच्या रुपाने साकारण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
- नागराज मलशेट्टी, हस्ताक्षर सुधार व सुलेखनकार, चिंचवडगाव
PNE25V38875, PNE25V38876

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.