महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दादर परिसरात हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. या आंदोलनावेळी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने केली जाणार आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार मतचोरीच्या आरोपांवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत.
मुंबईत जनआक्रोश आंदोलनाची हाकदादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजल्यानंतर हे आंदोलन होईल. या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. महायुती सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ‘हनीट्रॅप’ आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महायुतीतील मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मुख्य मागणी ठाकरे गटाची आहे. सरकारने या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यभरात जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीचे आंदोलनतर दुसरीकडे आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार दिल्लीत आंदोलन करणार आहेत. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याच आरोपांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात विरोधी पक्षातील सर्व खासदार सहभागी होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये निष्पक्षपणे काम केले नाही. त्यामुळे मतमोजणीत फेरफार केल्याने सत्ताधारी पक्षाला फायदा झाला. या आरोपांची सखोल चौकशी करा, अशी मागणी विरोधी खासदारांकडून करण्यात आली आहे.
काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर प्रमुख विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनातून ते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत. हे दोन्ही आंदोलन एकाच वेळी होत असल्यामुळे आज देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सरकारविरोधात आवाज उठवला जात आहे, तर दुसरीकडे दिल्लीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.