धक्कादायक! 'पैशाची फिरवाफिरवी करूनही कर्ज फिटेना'; पंढरपुरातील व्यावसायिकाने संपवले जीवन, सात सावकरांविरुद्ध गुन्हा
esakal August 11, 2025 11:45 PM

पंढरपूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला आणि खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी घडली.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी

सुरेश मारुती कांबळे (वय ६५), असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात खासगी सावकरीसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कांबळे यांचे पंढरपूर शहरात दिनेश फूटवेअर चप्पल विक्रीचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, व्यावसायातील मंदीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. अशातच त्यांनी काही खासगी सावकारांकडून सहा टक्के दराने व्याजाने पैसे घेतले होते.

पैशाची फिरवाफिरवी करूनही कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी सकाळी वाखरी येथे राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्या पत्नी शकुंतला कांबळे यांच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याने त्या घरातच होत्या. दरम्यान, बराच वेळ झाला तरी सुरेश कांबळे घरात दिसत नसल्याने पत्नीने शेजारील एका मुलाला शोधण्यास सांगितले असता, ते घराच्या वरच्या खोलीत पंख्याला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आले.

माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षा

कांबळे यांच्या खिशात चिट्टी सापडली असून त्यामध्ये कर्जबाजारीपणामुळे आणि सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड, संजय व्यवहारे व इरफान अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्नी शकुंतला कांबळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.