अॅड. सुकृत देव - कर सल्लागार
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करविषयक अनेक बदल केले गेले. या बदलांमुळे प्राप्तिकर विवरणपत्रामध्येदेखील हे बदल करावे लागले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै २०२५ वरून आधीच वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवून आहे, आर्थिक गैरव्यवहार शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे यंदा विवरणपत्र भरताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यावर एक नजर टाकू या.
प्राप्तिकर विवरणपत्र भरायच्या आधी, प्राप्तिकरदात्याची संपूर्ण माहिती तपासणे व भरणे गरजेचे आहे. यामध्ये पूर्ण नाव, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर (‘आधार’ला जोडलेला हवा, ज्यावर OTP सहज येऊ शकेल), बँकेची माहिती (ज्या बँक खात्यामध्ये रिफंड जमा होईल), त्याचबरोबर ‘ई-व्हेरिफाय’साठी अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे EVC चा, जो जोडलेल्या बँक खात्यामुळे ई-व्हेरिफाय होऊ शकतो, या सर्व गोष्टींची शहानिशा होणे आवश्यक आहे.
‘यूपीआय’द्वारे होणारे पेमेंट किंवा मिळणारे पैसे, यावर पण प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहे. बँकेमधून केलेले व्यवहार, हिशेबाची पुस्तके, जमा-खर्च पुस्तके, आढावा पत्रक किंवा विवरणपत्रामध्ये दाखवले आहे की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर विभागाकडून एक नवे वार्षिक माहिती पत्रक (AIS) मोबाईल ॲप्लिकेशन हे प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये प्राप्तिकरदात्याची वार्षिक माहिती, फॉर्म २६एएस व इतर माहिती पण मिळत आहे, जे प्राप्तिकरदात्यास उपयोगी आहे.
प्राप्तिकरदात्याचा ‘टीडीएस’ (कापून भरलेला प्राप्तिकर) व टीसीएस (गोळा करून भरलेला प्राप्तिकर) याचा सारांश बनवायला हवा. त्याचबरोबर सर्व माहिती/कागदपत्रे आदी नव्या अद्ययावत फॉर्म २६एएस, वार्षिक माहिती पत्रक (AIS), TIS व बँकेमधील व्यवहार यांच्याशी जुळत आहे की नाही, हे बघणे आवश्यक आहे.
प्राप्तिकरदात्याचे उत्पन्नाचे स्तोत्र कोणते आहेत, हे बघून आयटीआर फॉर्म १, २, ३, ४एस, आदींपैकी कोणता फॉर्म भरायला हवा, हे आधी बघावे. त्याचबरोबर जुनी करप्रणाली निवडायची, की नवी करप्रणाली? याचा आधी आढावा घेऊन मगच विवरणपत्र भरणे योग्य ठरेल.
पगारदार किंवा पेन्शनधारक (उदा. आयटीआर फॉर्म १) व्यक्ती यांनी दरवर्षी करप्रणाली बदलली तरी चालणार आहे. पण आयटीआर फॉर्म ३ किंवा ४ (उदा. व्यावसायिक व्यक्ती) भरताना जर जुनी करप्रणाली किंवा नवी करप्रणाली यामध्ये बदल करायचा असल्यास कलम ११५ बीएसी नियम व फॉर्म १० आयइए भरायची गरज आहे की नाही, हे तपासून घेणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र भरताना करदात्याला जर भांडवली लाभ २३ जुलै २०२४ च्या आधी व नंतर झाला असल्यास किंवा करदर बदल्यास, दोन्ही लाभाची माहिती वेगळी देणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे.