रत्नागिरीतील सर्वाधिक पाणी साठे दूषित
esakal August 12, 2025 07:45 AM

रत्नागिरीत सर्वाधिक पाणी साठे दूषित
आरोग्य विभाग ; मे महिन्यातील पावसाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः राज्यातील पाणी नमुन्यांची तपासणी दर महिन्याला राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून केली जाते. या तपासणीत मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर, तर जूनमध्ये रत्नागिरीमध्ये सर्वाधिक दूषित पाणी सापडले. यंदा मे महिन्यात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने दूषित पाणी नमुन्यामध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले.
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या मे महिन्यातील अहवालानुसार राज्यातील ३५ जिल्ह्यांतून १ लाख ८ हजार ७२० पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तेथील ४ हजार ३०७ पाणी नमुने दूषित सापडले. टक्केवारीमध्ये ४ टक्के पाणी दूषित सापडले. रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुक्यांतील एकूण १ हजार ७०२ पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये २९ पाणी नमुने दूषित सापडले. टक्केवारीत हे प्रमाण १.७० टक्के आहे. खेडमध्ये ४, गुहागर मध्ये ५, चिपळूणमध्ये १६, संगमेश्वर व लांजा प्रत्येकी १ व रत्नागिरीत २ नमुने दूषित सापडले. मे महिन्यात मात्र हे प्रमाण सर्वाधिक होते. मे महिन्यात तब्बल २.४३ टक्के पाणी दूषित सापडले होते. मात्र, राज्याची आकडेवारी बघता प्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पाणी दूषित सापडले आहे. मे महिन्यात जिल्ह्यात १ हजार ३९९ पाणी नमुने तपासण्यात आले. ३४ पाणी नमुने दूषित सापडले. एप्रिलमध्ये मात्र २० च पाणी नमुने दूषित सापडले.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.