मतदार याद्यातील घोळावरून रान पेटणार? महाविकास आघाडीचं ते पत्र आलं समोर; काय होता दावा?
Tv9 Marathi August 12, 2025 05:45 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या संदर्भात महाविकासआघाडीने ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं. या पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पत्रावर महाविकासआघाडीमधील तीन प्रमुख नेत्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे भाजपने महाविकासआघाडीवर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा महाविकासआघाडीने केला आहे.

पत्रात नेमकं काय?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक २३ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या निवडणुकीपूर्वी म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२४ ला महाविकासआघाडीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात महाविकासआघाडीने अनेक धक्कादायक दावे केले होते. भाजपने मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी ‘फॉर्म ६’ च्या डेटाबेसचा गैरवापर केला. हा डेटाबेस वापरून त्यांनी आपल्या बाजूने मतदान करू शकणाऱ्या लोकांची माहिती गोळा केली. या प्रक्रियेत, आपल्या बाजूने मतदान करतील अशा मतदारांची नावे हिरव्या शाईने तर विरोधात मतदान करू शकणाऱ्यांची नावे लाल शाईने चिन्हांकित करण्यात आली होती, असा दावा महाविकासाआघाडीने दिलेल्या पत्रात केला आहे.

या चिन्हांकित केलेल्या मतदार याद्या एका खासगी सर्व्हरवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर एका मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या, असा आरोपही महाविकासआघाडीने केला आहे. या यंत्रणेमुळे, भाजपला हवे असलेले मतदार याद्यांमध्ये कायम राहिले, तर बाकीची नावे आपोआप वगळली गेली. या बदलांची कोणालाही शंका येऊ नये म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार बनावट आणि फसवी नावे वाढवण्यात आली होती, असाही दावा पत्रात करण्यात आला आहे.

मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय

महाविकासआघाडीने दिलेल्या या पत्रात १३ मतदारसंघांची नावे दिली आहेत. या ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय महाविकासआघाडीला आहे. या मतदारसंघांमध्ये शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव रेल्वे या मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकासआघाडीने या सर्व मतदारसंघांतील मतदार याद्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे मागितली होती. परंतु आजपर्यंत ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही.

भाजपचा दावा खोटा

महाविकासआघाडीच्या या पत्राने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. निवडणूक आयोगाने यावर कोणती भूमिका घेतली आणि या आरोपांची चौकशी केली का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे महाविकासआघाडीकडून असे आरोप केले जात आहेत, असा दावा केला होता. आता महाविकासआघाडीने भाजपने केलेला हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.