शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
Tv9 Marathi August 12, 2025 05:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात नागपूरमधील पत्रकार परिषेदत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असा दावा पवार यांनी केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरात खळबळ उडवली. तर त्यानंतर पवारांच्या या विधामुळे महाराष्ट्रातही हादरे बसलेच. त्यांच्या या विधानाची अद्याप सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदाराने केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी ही मागणी केली असून उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असंही त्यांनी सांगितलं. शरद पवार ईडी कडे जसे स्वतःहून गेले तसंच या चौकशीला शरद पवार यांनी स्वत:हून सामोरं जावं असं बंब यांचं म्हणणं आहे. शरद पवार यांनी जो दाव केला होता, त्यानंतर बंब यांनी हे विधान करत पवारांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

 प्रशांत बंब यांची मागणी काय ?

राज्याचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, त्यांच्याकडेही असेच लोक आले होते, दानवे यांनी त्यांना त्वरित पोलिसांच्या हवाली केलं. तसं शरद पवार यांनी दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मग त्यांनी तसं का केलं नाही ? असा सवाल बंब यांनी विचारला. मला वाटतं, त्यांची एक उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

या उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. शरद पवार ईडी कडे जसे स्वतःहून गेले तसे या चौकशीला शरद पवार यांनी जावं असंही बंब म्हणाले. शरद पवार यांच्याबरोबर राहील गांधी यांच्याही कार्यालयाची चौकशीची मागणी त्यांनी केलं.

काय म्हणाले होते शरद पवार ?

राहुल गांधी यानी मतचोरीचा आरोप केल्यानंतर गेल्या आठवड्यात पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळ काय घडलं, त्याचा गौप्यस्फोट केला होता. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ती माणसं मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती. पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता. राजकारणात असे लोक भेटत असतात. त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांची भेट झाली. पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशिर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतला”, असंही शरद पवार म्हणाले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.