मी आजही ठाम, झेंडावंदन म्हणजे…. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं
Tv9 Marathi August 12, 2025 05:45 PM

गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद शिगेला पोहोचला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये तणाव आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यातच आता येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबद्दलचा निर्णय जाहीर झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत, असे यात नमूद करण्यात आले आहे. आता यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भरत गोगावले हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी नुकतंच अदिती तटकरेंच्या ध्वजारोहणावरुन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन भाष्य केले आहे. यावर त्यांनी मी आजही पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम आहे. रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे. झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रिपद यात फरक आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले.

पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम

“झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झालं असा काही भाग नाही. कारण ते पहिलंच देण्यात आलं होतं. त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य असेल. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मी आजही पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम आहे. झेंडावंदन झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठ निर्णय करतील, असं आम्हाला वाटतंय. झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रिपद यात फरक आहे. त्यामुळे यात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, असे भरत गोगावले म्हणाले.

रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही आमची इच्छा

“पालकमंत्रिपदासंदर्भात एकनाथ शिंदे जो काही निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल. सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही राज्याच्या गोष्टींसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट झाली असावी. पण काय चर्चा झाली हे मी विचारलं नाही. आम्ही कधीच नेत्यांना कुठे चाललात, कशाला चाललात हे विचारत नाही. झेंडावंदन त्याच्या हस्ते होतंय, याला माझी हरकत नाही. वरिष्ठांनी दिलेला निर्णय मान्य करायचा असतो. रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे. हो नक्कीच माझी इच्छा पूर्ण होईल”, अशा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.