निवडणूक आयोग रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेत – संजय राऊत कडाडले
Tv9 Marathi August 12, 2025 05:45 PM

काल दिल्लीच्या रस्त्यावर संसदेतील 300 पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन, संघर्ष केला. तुम्ही संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानता, पण त्याच मंदिरात चोऱ्या-माऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आमच्या अवतीभवती आहेत. त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचं निवडणूक आयोग काम करतं. 300 खासदार जेव्हा रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या दिशेने लात होते, तेव्हा त्यांना दिल्ली पोलिसांकडून अडवण्यात आलं, धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आले. आम्ही अतिरेकी, दहशतवादी आहोत का ? जर 300 खासदार निवडणूक आयोगसमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा निवदेन मांडलं असतं तर निवडणूक आयोगाला हार्ट अटॅक आला असता का ? असा खोचक सवाल राऊतांनी विचारला.

निवडणूक आयोग नेमकं कोणाला घाबरतंय ? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो, त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही मानतो. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून तो चोर आहे. रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीने विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत राऊतांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

मोदी हे अजरामर नाहीत

सध्याच्या निवडणूक आयोगाने टी.एन.शेषन यांचा अभ्यास करायला हवा, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कशा प्रकारे काम केलं? त्यांनी आदर्श आचारसंहितेच पालन कसं करायला लावलं ? याचा अभ्यास केला पाहिजे, असंही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी, अमित शहा हे काही अजरामर नाहीत, त्यांनाही कधीतरी या सत्तेवरून आणि जगातून जायचं आहेच, हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. लोकशाही टिकली तर हा देश टिकेल.

पण काल त्यांनी आम्हाला रस्त्यावर अटक केली, आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये डिटेन करण्यात आलं, अटकेची कागदपत्रं करायला उशीर झाला, त्यामुळे  आम्ही संसदेत पोहोचू शकलो नाही, आणि त्याच काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली असा आरोप राऊतांनी केला. हे सरकार किती कारस्थान करतंय. मोदी, शहा, फडणवीस हे सरळमार्गाने नव्हे तर लांड्यालबाड्या करून सत्तेवर आलेत, असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.