गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी मेट्रोची काम सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता कल्याण-शिळरोड वरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील २० दिवसांसाठी कल्याण शिळ रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टपासून २१ ऑगस्ट असे २० दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चे गर्डर बसवण्यात येणार आहे. या मेट्रोच्या कामासाठी हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी काही विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत. यानुसार येत्या ११ ते २० ऑगस्ट दरम्यान रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत कल्याणच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड आणि हलक्या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान प्रवेश बंद असेल. त्यानंतर, २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान शिळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत सुयोग हॉटेल, रिजेन्सी अनंतम चौक येथे प्रवेश दिला जाणार नाही.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनहे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल २० दिवस हा रस्ता बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करणे अनिवार्य असेल. आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त कल्याण डोंबिवलीकरांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यतापोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या काळात कल्याण-शिळ रोड वापरणाऱ्या प्रवाशांनी रात्रीच्या वेळी प्रवासाचा विचार करताना वेळ व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः, ज्यांना रात्री उशिरा प्रवास करायचा आहे, त्यांनी पर्यायी मार्गांची आधीच माहिती घेऊन ठेवावी. मात्र, या नियमातून पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. या मोठ्या बदलांमुळे शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी गाडी चालवताना संयम बाळगावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.