गणेशोत्सवात अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स , कमानी आणि वीज जोडणींमुळे कोट्यावधीचा महसूल बुडीत
esakal August 12, 2025 06:45 PM

गणेशोत्सवात अनधिकृत फ्लेक्सची भरभराट
फ्लेक्स, बॅनर्स, कमानी आणि वीजजोडण्यांमुळे कोट्यवधींचा महसूल बुडीत
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : गणेशोत्सवात शहरातील रस्ते, चौक आणि मंडप परिसरात आकर्षक फ्लेक्स बॅनर व भव्य कमानींची रेलचेल दिसते, मात्र या भव्यतेच्या आड मोठ्या प्रमाणावर महसूल गळतीचे चित्र दडलेले आहे.
नवी मुंबई पालिका हद्दीत गणेशोत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जाहिरातीसाठी फ्लेक्स बॅनर व कमानी उभारल्या जातात. परंतु यातील केवळ १० ते २० टक्के जाहिरातदारच पालिकेकडे अधिकृत परवाना घेऊन शुल्क भरतात. याबाबत सजग नागरिक मंचकडून मागील वर्षी गणेशोत्सव कालावधीतील वैध-अवैध बॅनर्स, फ्लेक्स, कमान, जाहिरातीबाबतचा तपशील माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवला होता. मात्र फक्त बेलापूर व नेरूळ विभागातूनच माहिती देण्यात आली.
उर्वरित बहुतांश फ्लेक्स, बॅनर, जाहिरात कमानी या अनधिकृत असून, यातील बहुतांश फ्लेक्स बॅनर हे राजकीय पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संबंधित असल्याने त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जाते. गणेशोत्सव कालावधीत शहरात विनापरवाना आढळून आलेल्या फ्लेक्स बॅनर जाहिरातीवर केलेल्या कारवाईचा तपशीलदेखील सजग नागरिक मंचकडून मागितला होता. परंतु त्यानुसार कोणावरही कारवाई झाल्याची माहिती दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आरटीआयमधून मिळालेली माहिती
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर विभागामध्ये केवळ ११ ठिकाणी तात्पुरते होर्डिंग उभारणीसाठी परवानगी घेण्यात आलेली होती. नेरूळ विभागाला अधिकृत फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून केवळ ४९ हजार १२१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. या विभागात ७१२ अवैध बॅनर्स काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे.

अनधिकृत वीजजोडणी
अनेक गणेश मंडपांत अधिकृत वीजजोडणी घेण्याऐवजी अनधिकृतरीत्या वीज वापरत असल्याचेही दिसून येते. या बेकायदेशीर वापरामुळे महावितरणालाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. प्रशासनाने योग्य पावले उचलून अनधिकृत बॅनर व वीजजोडण्यांवर कडक कारवाई केली. महसूल वाढण्याबरोबरच शहराच्या विद्रूपीकरणाला आळा बसेल, असे सजग नागरिक मंचकडून सांगण्यात आले.

फ्लेक्स, बॅनर्स, कमानीद्वारा जाहिराती या गणेश मंडळांना उत्पन्नाचे साधन असतात. असे असले तरी अनधिकृत पद्धतीने जाहिराती करणे हा प्रकार बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशोत्सवात घडणे संयुक्तिक वाटत नाही. अनधिकृत जाहिराती आणि अनधिकृत वीजजोडणीचे प्रकार टाळून गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचे पावित्र्य राखावे ही अपेक्षा आहे.
- अनिल पवार, सदस्य, सजग नागरिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.