रत्नागिरी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
esakal August 13, 2025 12:45 PM

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजवंदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी (ता. १५) येथील पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे.
मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यभर एकाचवेळी होणार असल्यामुळे सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन करावयाचा असल्यास त्यांनी तो १५ ऑगस्टला सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, पोलिस उपअधीक्षक गृह राधिका फडके आदी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अंतर्गत १३, १४ व १५ ऑगस्टला सर्व नागरिकांनी, संस्थांनी सहभागी होत तिरंगा फडकवावा. त्या संदर्भात जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत यांनी कार्यवाही करावी. त्याची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करावीत. शासकीय ध्वजवंदन समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.