पुणे : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या प्रारूप रचनेवर आलेल्या सूचना व हरकतींवरील विभागीय आयुक्तांकडून सुनावणी पूर्ण झाली आहे. प्रारूप रचनेवर आलेल्या २१७ सूचना व हरकतीपैंकी ११५ मान्य करण्यात आल्या असून ८८ फेटाळण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या निर्णयानुसार आता प्रभाग रचनेत बदल करून जिल्हा प्रशासनाला अंतिम रचना करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये २१७ हरकती, सूचनांची नोंद झाली. प्रारूप रचनेवर जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या हरकती आणि सूचनांवर संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले.
त्यासाठी २८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. हा अहवाल आता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आला आहे. या हरकती आणि सूचनांवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टपर्यंत निर्णय दिला. तर आता या निर्णयाची अंमलबजावणी आराखडा अंतिम करताना होणार आहे.
त्यासाठी जिल्हा प्रशासनाला १८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानंतर हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे अर्थात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे पुन्हा मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर आराखडा अंतिम होऊन तो प्रसिद्ध केला जाणार आहे.