धक्कादायक! इडलीमध्ये सापडली जिवंत अळी, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Tv9 Marathi August 14, 2025 12:45 PM

कल्याणमध्ये स्वच्छतेची आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची गंभीर स्थिती पुन्हा एकदा समोर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाने खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये जिवंत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर ग्राहकाने दुकानदाराकडे तक्रार केली असता दुकानदाराने माफी मागण्याऐवजी त्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

इडलीत सापडली जिवंत अळी

कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये १२ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. प्रथमेश गोरख शिंदे नावाच्या ग्राहकाने कल्याण पश्चिमेकडील कर्णिक रोडवरील बालाजी डोसा सेंटरमधून एक वडा सांबार आणि एक इडली प्लेट पार्सल घेतली. घरी गेल्यानंतर त्यांनी इडली खाण्यास घेतली असता, त्यांना त्यात एक जिवंत अळी दिसली. हा धक्कादायक प्रकार पाहून शिंदे यांनी तात्काळ दुकानात जाऊन दुकानदार लिंगराज लिगे गौडा यांना याबद्दलची माहिती दिली. पण आपली चूक मान्य करण्याऐवजी दुकानदाराने ती इडली फेकून दिली. त्यानंतर त्या दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली.

अदखलपात्र गुन्हा दाखल

या प्रकाराने संतापलेल्या शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी होणाऱ्या या गंभीर खेळाबद्दल थेट महानगरपालिकेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पालिकेने तात्काळ या दुकानावर कारवाई केली. यानंतर दुकानातील सर्व खाद्यपदार्थ जप्त केले. पालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दुकानदाराने प्रथमेश शिंदे यांना तुला बघून घेतो अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या शिंदे यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानदार लिंगराज लिगे गौडा विरोधात अदखलपात्र गुन्हा (NCR 1356/25) दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांमध्ये प्रचंड संताप

या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी अन्न सुरक्षा विभागाने अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेऊन शहरातील खाद्यपदार्थ दुकानांची तपासणी अधिक कठोर करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात तक्रारदार गोरख शिंदे यांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.