सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्याच कारण म्हणजे साप हे नेहमी बिळात किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी, जिथे त्यांना धोका जाणवणार नाही अशा ठिकाणी एखाद्या दगडाखाली, अडचणीच्या ठिकाणी लपलेले असतात. परंतु पावसाळ्यात होतं काय? की त्यांच्या बिळात पाणी शिरतं, साप जिथे लपलेले असतात ती जागा ओली होते, त्यामुळे त्यांना धोका जाणवतो आणि ते सुरक्षित जागेच्या शोधात जमिनीवर येतात. घरात कोरडी जागा असते, त्यामुळे साप घरात शिरतात आणि एखाद्या अडचणीच्या जागी, जिथे कोणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी लपून बसतात.
अनेकदा आपल्याला अशा जागेचा अंदाज येत नाही, आणि सर्पदंशाची घटना घडते. दुसरं आणखी एक सर्पदंशाचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकदा रात्रीच्या वेळी सर्पदंश होतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण घरात जमिनीवर झोपलेले असतो, विशेष: ग्रामीण भागांमध्ये आणि उबेसाठी साप आपल्या पांघरुणात घुसतो, आपली हालचाल झाली की शिकार म्हणून तो आपल्याला दंश करतो. असे साप अनेकदा आपल्या घरातच लपलेले असतात आणि रात्र झाली की ते शिकारीच्या शोधात बाहेर पडतात आणि सर्पदंश होतो.
मग घरात जर एखादा साप लपलेला असेल आणि तो बाहेर पडला की नाही याबाबत जर आपल्याला खात्री नसेल तर काय करायचं? त्यासाठी एक सोपा उपाय आहे. ग्रामीण भागात आजही अनेक जण हा उपाय करतता. ज्यामुळे तुमच्या घरात लपलेले साप बाहेर निघून जातात. ग्रामीण भागांमध्ये सापला घराच्या बाहेर घालवण्यासाठी बैलांचं शिंग जाळण्याची प्रथा आहे. त्याला प्रचंड उग्र असा विशिष्ट वास असतो, या वासामुळे साप त्या घरात थांबत नाही, असं म्हटलं जातं.
पोळा सणाच्या दिवशी बैलांना सजवलं जातं, यावेळी बैलाच्या शिंगाला सजवण्यासाठी त्याचे शिंग काही प्रमाणात तासले जातात, या तासलेल्या शिंगाचा जो भाग आहे, तो ग्रामीण भागातील लोक आजही जपून ठेवतात, घरात कुठे साप निघाला तर तो शिंगाचा भाग जाळला जातो, याच्या वासामुळे काहीही न करता साप घराच्या बाहेर दूर निघून जातो. तो त्या परिसरात सुद्धा थांबत नाही असं म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)