Maharashtra Live Updates : मुंबई, ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील
Sarkarnama August 15, 2025 10:45 PM
Buldhana Update : जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलन वाहून गेले

पश्चिम विदर्भातील महत्त्वकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात अनेक गावं पुनर्वसित झाली आहेत. त्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या गावाचं पुनर्वसनासाठी पुनर्वसन विभागाने रस्ता प्रस्तावित केला होता. मात्र नवीन रस्ता गावकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी आज जुन्या रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं. पूर्णा नदीला मोठा पूर आलेला असताना, या ठिकाणी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट होऊन दोन आंदोलनकर्त्यांनी पूर्ण नदीच्या पुरात उड्या घेतल्.या मात्र त्यातील एक विनोद पवार नामक आंदोलक वाहून गेल्याने या ठिकाणी जमा आक्रमक झाले आहेत.

Pratap Sarnaik : मुंबई, ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील

उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार आणि जिंकणार, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही. सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील. मुंबई, ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही."

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : 'ओबीसीचा आणि मराठ्याचा खरा शत्रू असेल, तर तो छगन भुजबळ!'

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. "ओबीसीचा आणि मराठ्याचा खरा शत्रू असेल, तर तो छगन भुजबळ आहे. ओबीसीतून आरक्षण घेतलय म्हणतोय धक्का लागू देणार नाही. आमच्या हक्काचा नोंदी आहेत, गॅजेट आमच्या हक्काचे आहेत. याच्यामुळे देवेंद्र फडणीस पुन्हा अडचणीत येईल. तिन्ही पक्षाची सत्ता याच्या एकट्यामुळे अडचणीत येईल, तू नीट राहा दुसऱ्याला शहाणपण शिकू नको," अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर केली आहे.

Naresh Mhaske On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वल्गना म्हणजे, गणपत वाणी बिडी पिताना...

संजय राऊत यांच्या वल्गना कशा असतात, हे सांगताना बा. सी. मर्ढेकर यांची, गणपत वाणी बिडी पिताना.., ही कविता म्हणत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना डिवचलं. यापूर्वी सरकार पडेल, असे बोलत होते. आता त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्ते थांबविण्यासाठी गमजा माराव्या लागतात. त्यांनी 100 जागा लढून 20 जागा जिंकल्या आहेत. संजय राऊत यांच्यावर थोडी राजकारण चालते का? असेही खासदार म्हस्के यांनी म्हटले.

Ahilyanagar Update : अहिल्यानगर कार्यालयाच्या तीन डिजिटल नाविन्यपूर्ण उपक्रमांचा मंत्री विखे पाटलांच्या हस्ते प्रारंभ

स्वातंत्र्यादिनानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या उपक्रमांचा उद्देश नागरिकांशी थेट व तातडीचा संवाद अधिक मजबूत करणे आणि योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवणे हा आहे. ‘जिल्हाधिकारी कार्यालय – संवाद सेतू’ या सेवेमार्फत विविध विभागांच्या सेवा, आवश्यक कागदपत्रांची यादी व नजीकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे.

KDMC live: हातात कोंबड्या घेत महापालिकेसमोर आंदोलन

चिकन मटण विक्री बंदीविरोधात आज सकाळी विविध संघटनांकडून कल्याण-डोबिंवली महापालिकेसमोर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक, तसेच कोंबड्या घेत आणि या निर्णयाविरोधात घोषणा देत आंदोलनकर्ते, खाटीक संघटनेटेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

Maharashtra Independence Day 2025 live : महाराष्ट्र सदनात ' स्वातंत्र्य दिन' साजरा

नवी दिल्ली: भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीतासह राज्य गीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सूरक्षा बलांचे पथसंचलन झाले.

Independence Day 2025 live : कोल्हापुरातील शेतकऱ्यांचे अभिनव आंदोलन

शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजानं शेतातच तिरंगा फडकवला. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकावून शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग ला विरोधी करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात आले.

मांसविक्री बंदीवरून कल्याणमध्ये आंदोलन; तणावाचे वातावरण

स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मांसविक्रीबंदी करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Independence Day 2025 live: दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या सत्कार

वाशिमचे पालकमंत्री, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात झाला. शहीद सैनिकांच्या पत्नी,पोलिस अधीक्षक, अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Independence Day 2025 live: मंत्रालयात फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन

देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केले. यावेळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश पोलिसांकडून सलामी देण्यात आली.

मोदींच्या भाषणात ज्योतिबा फुलेंचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे.

देशातील महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी सुदर्शन चक्र मिशन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, जी शत्रूचा हल्ला केवळ निष्फळ करणार नाही तर अनेक पटींनी जोरदार प्रत्युत्तरही देईल. आपण पुढील दहा वर्षांत सुदर्शन चक्र मिशनला प्रखरतेने पुढे नेऊ. या अंतर्गत २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना या राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणले जाईल. या सुरक्षा कवचाचा विस्तार सातत्याने होत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित वाटावे, यासाठी मी २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला आहे.

देशाला वेगाने पुढे जायचे आहे- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण खूप वेगाने पुढे जायचे आहे. मी हे देशासाठी करत आहे, माझ्यासाठी करत नाही. कोणाचे वाईट करण्यासाठी करत नाही. "गेल्या दशकभरात भारताने सुधारणा केल्या, कामगिरी केली आणि परिवर्तन घडवून आणले आहे. पण आता आपल्याला आणखी मोठ्या ताकदीने पुढे जायचे आहे. अलीकडच्या काळात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामध्ये एफडीआय, विमा क्षेत्रातील सुधारणा, आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना भारतात कार्य करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे..."

सिंधूच्या पाण्यावर भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशातील जनतेला आता स्पष्ट समजले आहे की सिंधु करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी आपल्या शत्रूंची शेती सिंचन करत आले, तर माझ्या स्वतःच्या देशातील शेतकरी आणि जमिनी तहानलेली, पाण्याविना राहिली. हा असा करार होता ज्यामुळे गेल्या सात दशकांपासून माझ्या देशातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. आता या पाण्यावरचा हक्क फक्त भारताच्या शेतकऱ्यांचा आहे..."

लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशाराल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पाकिस्तानला इशारा दिला की अणुबाॅम्बची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. लष्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. पाणी आणि रक्त वाहू देणार नाही. सिंधू प्रणालीच्या नद्यांवर फक्त भारताचा अधिकार.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजरोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.