टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला ट्यूमर झाल्याच्या बातम्यांनी सगळेच हादरले होते, तिनेच याबद्दल माहिती दिली होती. मात्र जूनमध्ये तिच्या लिव्हरमधून कर्करोगाचा ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर, तिला दीड वर्ष उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने एका व्लॉगमध्ये खुलासा केला होता की, तिचा ट्यूमर पुन्हा येण्याचा धोका जास्त आहे, म्हणून डॉक्टरांनी तिला एक वर्षापेक्षा जास्त काळ उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.
त्यामुळेच गेल्या महिन्यात, दीपिकाने टार्गेटेड थेरपी सुरू केली आणि पहिला महिना पूर्ण झाल्यानंतर तिने एका नव्या व्लॉगमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. मात्र या थेरपीनंतर तिला केस गळती, अल्सर आणि शरीरावर पुरळ येणं अशा अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे, असं तिनेच सांगितलं.
तिच्या नवीन व्लॉगमध्ये, दीपिकाने हेल्थ अपडेट शेअर केले. ती म्हणाली, ‘मी टार्गेटेड थेरपीच्या गोळ्या घेण्यास सुरुवात करून एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे, म्हणून आम्हाला फॉलो-अपसाठी डॉक्टरकडे जावे लागणार आहे. आम्ही काही ब्लड टेस्ट केल्या आणि ईसीजी देखील काढला. मला थोडी भीती वाटत्ये. आता मी जेव्हाही एखाद्या डॉक्टरकडे जाते, तेव्हा मला असंच वाटतं. मला चिंता वाटते, आणि पुढच्या महिन्यात जेव्हा आम्ही माझे स्कॅन आणि ट्यूमर मार्कर चाचणी पुन्हा करू तेव्हा तो आणखी वाढलेला असू शकतो’, अशी भीती तिने बोलू दाखवली.
दीपिकाची तब्येत कशी ?
डॉक्टरांकडे फॉलोऑपसाठी जाऊन आल्यावर दीपिका कक्कर म्हणाली, ‘मी डॉक्टरांना मला वाटणाऱ्यां चिंतांबद्दल सांगितले. माझ्या नाक आणि घशाच्या समस्या, अल्सर आणि तळहातावर पुरळ हे सर्व मी टार्गेटेड थेरपीसाठी घेत असलेल्या औषधाचे दुष्परिणाम आहेत. जर सूज खूप वाढली तर या साईड-इफेक्ट्सवर उपचार करण्यासाठी मला औषधे दिली गेली आहेत. गोळ्यांमुळे माझे केसही गळत आहेत. हे दुष्परिणाम फक्त 10 टक्के लोकांमध्ये दिसतात आणि मी त्यापैकी एक आहे. पण मी याबद्दल तक्रार करणं योग्य नाही, कारण औषध घेणे जास्त महत्वाचे आहे’ असंही तिने सांगितलं.
आणखी टेस्ट्स बाकी
ही औषधं नीट लागू पडावी, त्याचा उपयोग व्हावा आणि आणखी कोणतीही समस्या न येवो, अशी मी प्रार्थना करत असते, असंही दीपिकाने नमूद केलं. चांगली गोष्ट म्हणजे माझे ब्लड रिपोर्ट आणि ईसीजा सामान्य आहेत. माझं शरीर ही औषध नीट स्वीकारतंय. फक्त काही साईड-इफेक्ट्स दिसत आहेत. पुढच्या महिन्यात, माझ्या सर्जरीला तीन महिने पूर्ण होतील आणि माझे पहिले स्कॅन होईल. सर्व काही व्यवस्थित व्हावे म्हणून कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.’ असं दीपिकाने सर्वांना सांगितलं.
दीपिका ही काही महिन्यांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये दिसली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव तिने शो मध्येच सोडला होता.