रावेत : महानगरपालिकेच्या आकुर्डी, प्राधिकरण, निगडी, रावेत, किवळे भागातील रुग्णालयांत आणि दवाखान्यांमध्ये अद्यापही डिजिटल व्यवहाराच्या सुविधा नाहीत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना रोख रक्कम बाळगणे भाग पडत असून मोठा मानसिक ताण आणि उपचारांमध्ये विलंब होत असल्याचे चित्र आहे,
केंद्र सरकारकडून डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना दिली जात आहे. त्यामुळे बहुतेक खासगी रुग्णालये, औषध दुकाने, किराणा दुकानांपासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्यांपर्यंत सर्वत्र ‘यूपीआय’ द्वारे रक्कम स्वीकारली जाते. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांत या सुविधेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
अनेकदा रुग्णालयांमध्ये तातडीची शस्त्रक्रिया किंवा उपचार करावे लागतात. अशावेळी जवळ पुरेसे रोख पैसे नसल्याने नातेवाईकांना बाहेर जाऊन पैसे काढावे लागतात. त्यामुळे उपचार प्रक्रियेत विलंब होतो आणि रुग्णाची प्रकृती बिघडण्याचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर, महापालिकेने तातडीने सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांत ‘यूपीआय’ कार्ड स्वाइप मशिन, नेट बँकिंग यासारख्या सुविधा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर, याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्या, तरी त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.
महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया असतात. महापालिकेच्या लेखा विभागात यासंदर्भात आमचे बोलणे झाले आहे. डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी संबंधित बँकांशी प्रक्रियादेखील सुरू आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच ही सुविधा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- डॉ.लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
ताप आला, म्हणून मी उपचारासाठी आले होते. रोख रक्कम नव्हती, त्यामुळे माझी गैरसोय झाली. डिजिटल पेमेंट प्रणाली असल्यास सर्वसामान्य रुग्ण आणि नातेवाइकांना लाभ होईल.
- लता राठोड, स्थानिक नागरिक