आशिया कप आधी या भारतीय फलंदाजाची दमदार बॅटिंग, फक्त इतक्या चेंडूत खणखणीत अर्धशतक
Tv9 Marathi August 16, 2025 10:45 PM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पुढच्या काही दिवसात टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी अनेक स्टार खेळाडू दावेदार आहेत. सिलेक्टर्ससाठी 15 खेळाडूंची निवड करणं कठीण असणार आहे. या दरम्यान एका खेळाडूने दमदार इनिंग खेळून आपली दावेदारी मजबूत बनवली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केरळ क्रिकेट असोशिएशनकडून एका फ्रेंडली सामन्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मॅचमध्ये भारताचा विकटेकीपर फलंदाज संजू सॅमसन शानदार इनिंग खेळला.

संजू सॅमसन ही इनिंग अशावेळी खेळलाय, जेव्हा त्याच्या आयपीएल भविष्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजूने राजस्थान रॉयल्ससोबत आपलं नात संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही टीम त्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दरम्यान तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक सामना झाला. या मॅचमध्ये संजूने केसीए सेक्रेटरी इलेवनच नेतृत्व करत शानदार अर्धशतक झळकावलं. आपल्या टीमला रोमांचक विजय मिळवून दिला.

शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय

संजू सॅमसनने या मैत्रीपूर्ण T20 सामन्यात चौथ्या नंबरवर फलंदाजी करताना 36 चेंडूत 54 धावा फटकावल्या. या इनिंगमध्ये त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आयपीएल 2025 नंतर संजूचा हा पहिला सामना होता. संजूच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी इलेव्हनने 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये एक विकेटने विजय मिळवला. वेगवान गोलंदाज बासिल थम्पीने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला.

शराफुद्दीनचीशानदार गोलंदाजी

या मॅचमध्ये संजूचा साथीदार विष्णू विनोद 69 धावांची इनिंग खेळला. त्याने सेक्रेटरी इलेव्हनला मजबूत सुरुवात दिली. दुसरीकडे केसीए प्रेसिडेंट इलेवनने कॅप्टनशिप करणाऱ्या सचिन बेबीच्या टीमने 184 धावा केल्या. यात रोहन कुन्नुमलने 60 रन्स आणि अभिजीत प्रवीणचे 47 रन्स आहेत. पण शराफुद्दीनने शानदार गोलंदाजी केली. त्याने 3 विकेट काढल्या. आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमुळे चर्चेत आहे. पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने या स्पर्धेत खेळू नये अशी अनेकांची मागणी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.