टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहितनंतर विराटनेही तडकाफडकी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना झटका दिला. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आले. रोहित आणि विराटच्या निवृत्तीवरुन भारताचे माजी खेळाडू करसन घावरी यांनी खळबळजनक दावा केला आहे. रोहित-विराटने स्वइच्छेने नाही, तर बीसीसीआय आणि निवड समितीच्या अंतर्गत राजकारणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचा दावा घावरी यांनी केला आहे.
घावरी यांच्यानुसार, विराट कोहली आणखी किमान 2 वर्ष कसोटी क्रिकेट खळू शकला असता. तसेच घावरी यांनी बीसीसीआयने भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिकेटरला निरोप न देण्याच्या मुद्द्यावरुनही भाष्य केलं.
“हे एक रहस्य आहे. विराटने निश्चितच भारतासाठी पुढील काही वर्षांपर्यंत खेळणं सुरु ठेवायला हवं होतं. मात्र काही गोष्टींमुळे त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचं मला वाटतं. विराटने निवृत्ती घेतली तेव्हा बीसीसीआयने त्याला निरोपही दिला नाही”, असंही घावरी यांनी नमूद केलं. घावरी विक्की लालवानी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये घावरी यांना विराटच्या तडकाफडकी कसोटी निवृत्तीबाबत प्रश्न करण्यात आला. यावर घावरी यांनी प्रतिक्रिया दिली.
विराट आणि रोहित हे दोघेही भारतीय टीम मॅनेजमेंटच्या अंतर्गत राजकारणाचे शिकार झाल्याचं घावरी यांनी म्हटलं. “हे बीसीसीआयचं अतंर्गत राजकारण आहे, जे समजणं फार अवघड आहे. त्यामुळे त्याने वेळेआधी निवृत्ती घेण्यामागे हे कारण असू शकतं, असं मला वाटतं”, असं घावरी यांनी सांगितलं.
“तसेच रोहितनेही वेळेआधी निवृत्ती घेतली. रोहितला बाहेर होण्यास सांगण्यात आलं होतं. रोहितला संघातून बाहेर होण्याची इच्छा नव्हती. मात्र निवड समिती आणि बीसीसीआयचे विचार वेगळे होते”, असंही घावरी यांनी म्हटलं.
दरम्यान रोहित आणि विराट या दोघांनी कसोटीआधी 2024 वर्ल्ड कपनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता. त्यामुळे ही जोडी आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. हे दोघे आता मायदेशात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक्शन मोडमध्ये दिसू शकतात. मात्र त्याआधी या दोघांच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीबाबतही चर्चा रंगली आहे.