काटेवाडी, ता.१६ : जर्सी गायीच्या दुधाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. ‘जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढवांच्या संयोगातून बनवलेली आहे आणि तिच्या दुधामुळे नपुंसकता येते.’ हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे, निराधार आणि दिशाभूल करणारे आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील जर्सी आणि होल्स्टीन-फ्रिजियन गायींवर अवलंबून असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे दूध उद्योगावर आर्थिक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अपप्रचार थांबविण्याची मागणी जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून होत आहे.
जर्सी गाय ही इंग्लंडमधील जर्सी बेटावर शेकडो वर्षांपूर्वी विकसित झालेली नैसर्गिक दुग्ध जाती आहे तर होल्स्टीन-फ्रिजियन ही नेदरलँड्स आणि जर्मनीतून उगम पावलेली उच्च दुग्धोत्पादन देणारी जात आहे. या दोन्ही जाती कोणत्याही कृत्रिम संकरातून निर्माण झालेल्या नाहीत. जर्सी गायीचे दूध उच्च प्रथिने (३.९५ टक्के) आणि स्निग्धांश (४.८४ टक्के) युक्त असते. होल्स्टीन-फ्रिजियन गायीचे दूध ३.२ टक्के प्रथिने आणि ३.६ टक्के स्निग्धांश असलेले असते. दोन्ही प्रकारचे दूध कॅल्शियम (२७६ मि.ग्रॅ./कप) आणि फॉस्फरस (२२७ मि.ग्रॅ./कप) यांसारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. वैज्ञानिक संशोधनात या दुधामुळे नपुंसकता किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवत असल्याचा कोणताही पुरावा नाही. महाराष्ट्रात दुग्धोत्पादनासाठी या दोन्ही जाती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, या दोन्हीही संकरित गाई दररोज १२ ते ३० लिटर दूध देऊ शकतात, असे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले.
सध्या दुधाचे दर वाढत आहेत. आम्हाला सध्या लिटरला ३३ रुपये दर मिळत आहे. हा दुधाचा दर समाधानकारक नसला तरी त्यात वाढ होत आहे हे महत्त्वाचे आहे. दूध व्यवसाय सध्या तोट्यात आहे. त्यामध्ये अशा अफवा पसरवल्या गेल्या तर या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अशी शेतकरी विरोधी अफवा आणि विधाने करणाऱ्यांवर शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे.
- तुकाराम देवकाते, दूध उत्पादक, लासुर्णे (ता. इंदापूर )
जर्सी हे एक ब्रीड आहे. आपल्या येथील इंडिगोस ब्रीड बरोबर जर्सी गाईचे सजातीय संकर झाले, म्हणून त्याला संकरित गायी म्हणतात. जर्सी गायीच्या दुधाने नपुंसकता येते याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
- डॉ. अंकुश परिहार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, पुणे
वर्गीस कुरियनसारख्या शास्त्रज्ञांनी देशामध्ये धवल क्रांती घडवली. त्यामुळे आपण आता दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करत आहोत. दूध व्यवसायावर प्रक्रिया करून अनेकजण मोठे झाले. जर्सी गायीच्या दुधाबाबतच्या अफवा उत्पादकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. दूध व्यवसायातील मूळ प्रश्नांवर बोलायला हवे तिथे काही विघ्नसंतोषी व्यक्ती आणखीन संकटे निर्माण करत आहेत.
-ॲड. श्रीकांत करे, राज्य समन्वयक, दूध उत्पादक संघर्ष समिती, महाराष्ट्र