डॉ. संजय उपाध्ये - saptrang@esakal.com
‘मस्त बिनधास्त २४ तास’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका सहनिवासातील रहिवाशाच्या घरी चहापानाला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं ‘‘तुम्ही पंजाबी समोसा खाणार का? पण खूप तिखट आहे.’’ तेव्हा मी म्हटलं, ‘‘जरूर खाणार!’’ तर त्यांच्या पत्नीने विचारलं-
‘‘तुम्हाला पित्त होत नाही का, असे तिखट पदार्थ खाल्ल्याने?’’ मी म्हटलं, ‘‘माझ्या खिशामध्ये पित्ताची गोळी आहे त्यामुळे मला पित्त होत नाही.’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘म्हणजे काय?’’ म्हटलं, ‘‘माझ्या खिशात गोळी आहे हे मला ठाऊक असल्यामुळे मला पित्त होत नाही.’’
‘‘Fear of the Disease is a cause of the Disease! खिशात औषध असल्याने माझं मन निर्भय राहतं नि पित्त होत नाही.’’ माझं उत्तर ऐकून त्यांना ते पटलं. म्हणाले, ‘‘खरं आहे हे असं केलं पाहिजे.’’ मी म्हटलं, ‘‘faster the speed, faster the anticipation’’ हा हायवेवरचा गाडी चालवताना जो नियम आहे तो आपल्या आयुष्यातही आपण अमलात आणला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पुढे काय करणार आहात आणि त्याचे परिणाम काय आहेत, त्याचा आधीच उपाय करून ठेवला, की मग जी गोष्ट करतो त्याच्या परिणामांची धग लागत नाही.
नेमकं असंच आहे ‘सकाळ - सह्याद्री सुरक्षा कवच’च्या बाबतीतही! मी त्यांना म्हटलं, की ‘सकाळ - सह्याद्री सुरक्षा कवच’ तुम्हाला उपयोगात आणावं लागेल, असं म्हटलं की तिथे दुर्दैवाचा मुद्दा आला किंवा वाईट इच्छेचा मुद्दा आला; परंतु जर ते घेऊन ठेवलं तर पुढे प्रत्येक वेळा वाईट गोष्टी घडत नाहीत. कारण आपल्या मनामध्ये एक शाश्वती असते, खात्री असते की आपल्याला काही आजार झाला तर रुग्णालयाच्या खर्चाची रक्कम आवाक्यात असेल. तुम्ही निर्धास्त होता नि आजारी पडत नाही.
ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये अडचण अशी असते की वय जसं वाढत जातं तसं मन आणि कंबर आपापल्या जागा बदलतात. त्यामुळे मन छोटं होत जातं आणि कंबर मोठी होत जाते. तिथेही अडचण अशी, की मन छोटं झाल्याने त्यात अनेक विषय मावत नाहीत. मग नुसताच मनात गलका होतो नि तुम्ही आरामदायी राहात नाही. मग एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. जीवन जगण्याचा आनंद घेण्याऐवजी संकटापासून पलायन कसं करता येईल, याचा विचार सुरू होतो. त्यामुळे जीवनाचा आनंद घेण्यासाठी मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी सोडून द्या.
मन मोठं केलं की मग भरपूर विषय त्यात मावू शकतात किंवा नावडते सोडता येतात आणि मजा करता येते. ‘मस्त बिनधास्त २४ तास’ असं जगता येतं. आणि म्हणून faster the speed, faster the anticipation असे तुम्ही जगलात की आयुष्य सोपं होत जातं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक मला भेटले. काही वेळेला पहिल्या रांगेच्या पुढे पुन्हा गर्दी वाढली म्हणून खुर्च्या लावल्या तर पहिल्या दोन रांगांमधील ज्येष्ठ नागरिक भांडत राहिले. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी, व्यायाम करावा, आनंदात राहावं. तसं झाले तर मग तब्येत उत्तम राहते. तुम्ही जेवढे हसाल तेवढे चांगले, तेवढी तब्येत उत्तम!
मला एका कार्यक्रमात विचारलं, की ‘‘तुम्ही एका वाक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सल्ला द्या.’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘सकाळी जेव्हा तुम्ही फिरायला जाता व्यायामासाठी तेव्हा पाच जणांनी एकत्र जा.’’ तेव्हा त्यांनी विचारलं, ‘‘पाचच का?’’ मी म्हटलं, ‘‘याचं कारण असं, की समजा रस्त्यात काही एकाच्या बाबतीत अघटित घडलं तर चार माणसे लागतीलच ना.’’ त्यावरती सगळे हसले, काही ना राग आला, त्यांना वाटलं मी चुकीचं नि वाईट बोलतोय, ब्लॅक कॉमेडी करतो की काय?
मला असं वाटतं, ‘जन्म नि मृत्यू नसतो आपला, ध्यानी हे ठेवावे जगणे केवळ अपुले, असते त्यातच मग्न राहावे प्रसन्न, मन मग देईल सिद्धी, अखंड राहील कणा आजवरी, जे जगलो ते मी जिंकलो असे म्हणा.’
जीवन आनंदाने जगण्यासाठी एकदा ही भूमिका घेतली तर सगळं छान होतं. वेदना, व्याधी या काळातसुद्धा आनंददायी राहावं. माझे वडील पाठीतून कळ आली की ‘घेई छंद मकरंद’ हे गाणं मोठ्यांदी म्हणायचे. मी विचारायचो, ‘‘हे काय?’’ ते म्हणायचे, ‘‘नाही तरी बोंब मारायचीच आहे तर तुझ्या कानावरती गाणं तरी जाऊ दे.’’
मला असं वाटतं, की ही भूमिका सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी. त्यायोगे पुढच्या तरुण पिढीला ज्येष्ठ नागरिकांकडे बघून आपणही जास्त जगलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे.
‘लहानपण देगा देवा’ऐवजी स्वर्गात जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्येष्ठ नागरिकांकडे बघून नवीन अभंग रचतील-
ज्येष्ठपण देगा देवा
तरुणांनो करा हेवा
वय उतारावर फेक
प्रकृतीचे उत्तम ब्रेक
आम्ही नाही खात कच
सकाळ सह्याद्री कवच!
या ‘सकाळ - सह्याद्री सुरक्षा कवच’च्या निमित्ताने मी सादर केलेल्या कार्यक्रमांच्या प्रारंभी खास या कार्यक्रमासाठी लिहिलेली जी कविता सादर करत होतो, ती आपल्यासमोर सादर करून हा लेखन प्रपंच संपवतो.
...म्हणून सांगतो आजपासून
जगण्याचा घ्या एकच ध्यास
मस्त बिनधास चोवीस तास!
तुम्ही सांगा जन्म तुमचा
तुम्हाला विचारून झाला काय?
भाऊ बहीण यांचा हिशेब
तुम्हाला विचारून केला काय?
तुम्ही जन्माला आला आहात
हे तुम्हाला कळले कधी?
ते कळायला कळावा लागतो
तुमच्या मधला मी आधी
अहो जी गोष्ट तुमच्या जीवनात
तुम्हाला विचारून झालीच नाही
त्या गोष्टीचा तुम्ही का हो
इतका करून घेताय त्रास
म्हणून सांगतो आजपासून
जगण्याचा घ्या एकच ध्यास
मस्त बिनधास चोवीस तास! ।।१।।
शाळेमध्ये शिकलात जे ते
नंतर उपयोगी पडले का?
सत्राचा पाढा आला नाही
म्हणून लग्न व्हायचे अडले काय?
कॉलेजमधे शिकता शिकता
प्रेमात कधी पडलात काय?
लेक्चर्सना दांड्या मारून
कॅंटीन अडवून बसलात काय?
अहो नशिबात होतं तेच घडलं
तुम्ही काहीच ठरवलं नाही
तुम्ही आम्ही पहिल्यापासून
त्या नियतीचे आहोत दास
म्हणून सांगतो आजपासून
जगण्याचा घ्या एकच ध्यास
मस्त बिनधास चोवीस तास! ।।२।।
तारुण्याच्या हालचाली तुमच्या
हळूहळू होतात ठप्प
सरकार म्हणतं सवलती घ्या
की म्हातारे सारे होतात गप्प
मुलगा म्हणतो प्रॉपर्टी
त्याच्या नावावर करत नाही?
त्याला सांगा मी मेल्यावर तुझीच होणार
मेल्या तुला कळत नाही?
विचारलं तरच मत द्या
नाहीतर मौनात आहे स्वार्थ
पुढच्या पिढीच्या मनासारखा
तुम्ही ही करा टाइम पास
म्हणून सांगतो आजपासून
जगण्याचा घ्या एकच ध्यास
मस्त बिनधास चोवीस तास! ।।३।।
रोज सकाळी लक्षात येते
आता आपल्याला सुरक्षा हवी
सह्याद्रीवर चढण्यासाठी
सुद्धा आता रिक्षा हवी
कवच हवं आरोग्याचं
भीती कमी करण्यासाठी
हातात आता काठी हवी
सरळ सोप चालण्यासाठी
मी माझे विसरून जाऊन
त्याचं त्याला ठरवू दे
असे जगलात तर तुमच्यासाठी
विमान वरून येईल खास
म्हणून सांगतो आजपासून
जगण्याचा घ्या एकच ध्यास
मस्त बिनधास चोवीस तास! ।।४।।
कसे मिळवाल कवच?
नोंदणीचा आज अखेरचा दिवस आता परत मुदतवाढ नाही... त्वरा करा
नूतनीकरण व नवीन नावनोंदणी सर्व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० सुरू. अधिक माहितीसाठी ७७७००६६८८१ किंवा www.surakshakawach.in या वेबसाईटला भेट द्या.