जसप्रीत बुमरा खेळणार की पुन्हा विश्रांती घेणार असा प्रश्न अवघ्या हिंदुस्थानला पडला होता. अखेर बुमरा फिटनेस टेस्ट पास झालाय आणि त्याने आशिया कपसाठी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केल्यामुळे यूएईत बुमरा वादळ घोंगावणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे मंगळवार, 19 ऑगस्टला होणार्या संघनिवडीच्या बैठकीत सूर्यकुमार यादवबरोबर बुमराच्या नावाचीही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच संपलेल्या अॅण्डरसन-तेंडुलकर
ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या पाच कसोटींच्या मालिकेत प्रत्येक कसोटीपूर्वी बुमरा खेळणार की नाही हाच प्रश्न सर्वाधिक चर्चिला जात होता. बुमरा केवळ तीन कसोटी सामनेच खेळणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले असले तरी त्याला महत्त्वाच्या दोन कसोटीत विश्रांती दिल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. तरीही याच दोन कसोटींत हिंदुस्थानच्या नव्या दमाच्या गोलंदाजांनी मोहम्मद सिराजच्या मार्गदर्शनाखाली कसोटी जिंकण्याची करामत केली आणि मालिका बरोबरीतही सोडवली.
बुमरा हा हिंदुस्थानी गोलंदाजीचा कणा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. पण त्याच्या अनुपस्थितीतही संघ विजयाचा झेंडा फडकावू शकतो हे अवघ्या जगाने पाहिलेय. त्याला दोन कसोटींत विश्रांती दिल्यामुळे त्याच्यासह संघव्यवस्थापनावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. फिट असूनही बुमराला विश्रांती देणे कुणालाही पटले नव्हते. त्यामुळे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱया आशिया कपमध्ये त्याच्या खेळण्याबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता त्यानेच आपण फिट असल्याचे सिद्ध केल्यामुळे त्याच्या फिटनेस आणि खेळण्याबाबत असलेली अनिश्चित संपुष्टात आली आहे. तसेच त्याने आपण आशिया कपमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचेही बीसीसीआयला कळवले असल्यामुळे 19 ऑगस्टला संघनिवडीत त्याचे नाव असेल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
बुमरा गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर हिंदुस्थानकडून एकही टी-20 व वन डे सामना खेळलेला नाही. मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात बुमराने दक्षिण आफ्रोविरुद्ध केवळ 18 धावांत 2 बळी टिपत हिंदुस्थानला नाटय़मय विजय मिळवून दिला होता.
अलीकडेच ओव्हलमध्ये झालेल्या अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील निर्णायक पाचव्या कसोटीसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. व्यवस्थापनाने त्याचा कामाचा ताण कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या चार कसोटींपैकी तीन सामन्यांत तो खेळला होता. त्यात त्याने दोनवेळा पाच विकेट टिपत बजावत एकूण 119.4 षटके टाकली होती. मात्र अंतिम कसोटीतील गैरहजेरीमुळे त्याच्या फिटनेसवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.