सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शहरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना गणेश मूर्ती विक्रीसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध करून दिले जाते. यंदाही शहरात आठ ठिकाणे निश्चित केली आहेत. आतापर्यंत महापालिकेकडे ३१ जणांनी स्टॉल उभारणीसाठी मागणी अर्ज केले आहे. आजपासून २८ ऑगस्टपर्यंत या कालावधीत गणेश मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ ची तयारी सुरू केली आहे. शहरातील गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्टॉल उभारण्याकरिता मैदाने उपलब्ध करून देणे, मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्ती, झाडांच्या फांद्या, वायरी काढणे. गणेशमूर्ती विसर्जन, मंडळांची मिरवणूक व्यवस्था, विसर्जन कुंडांची स्वच्छता, गणपती संकलन केंद्र आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. शहरात छोटे-मोठे असे साधारण २५० व्यापाऱ्यांकडून तीन लाख मूर्तींची विक्री होते. या मूर्ती सोलापूरसह मुंबई, कर्नाटक आणि परदेशात जातात.
यंदा सोलापूरची गणेश मूर्ती लंडनमध्येही पाठविण्यात आली आहे. नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी महापालिका शहरातील मैदान व्यापाऱ्यांना स्टॉल उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देते. यंदाही महापालिकेने व्यापाऱ्यांसाठी शहरात आठ ठिकाणी गणेश मूर्ती विक्री केंद्र उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी अत्यल्प दरात म्हणजे एक रुपया स्क्वेअर फूट दराने स्टॉल उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देते. आतापर्यंत मनपाकडे ३१ जणांनी स्टॉलच्या जागेकरिता अर्ज केले आहे. आजपासून व्यापाऱ्यांना मागणीनुसार विक्रीसाठी जागाही ताब्यात दिली जाणार आहे.
सोलापुरात मुर्ती विक्रीची प्रमुख आठ ठिकाणे
सोलापूर शहरातील पुंजाल मैदान, आसार मैदान, पार्क चौक स्टेडिअमसमोर, कर्णिकनगर येथील चिल्ड्रन पार्क परिसर, विभागीय कार्यालय- दोनजवळ राजेंद्र चौक, हवामान खात्याचा कार्यालय परिसर व वल्ल्याळ मैदान आदी.
कलर नव्हे, गोल्ड पेपरची सजावट
सोलापूर शहरातील बहुतांश व्यापारी हे पेण, मुंबई, नगर येथून तयार गणपती मूर्ती आणतात. त्या मूर्तींची नावीन्यपूर्ण अशी सजावट करतात. स्टोन डिझाईन, विविध रूपातील गणपतीचा विविध पेहराव, साईज, मॉडेल, सजावट आदींवरून मूर्तीचे दर निश्चित केलेले आहेत. ३५० रुपयांपासून ते १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंतची गणपतीचे दर आहेत. यंदा मूर्तींना कलर नव्हे तर गोल्ड पेपरची नावीन्यपूर्ण सजावट केलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत.
यंदा लंडनलाही सोलापूरची गणेशमूर्ती
सोलापुरात तयार झालेल्या लाल बागचा राजा विशेष मूर्तीला परदेशातून मागणी आहे. सोलापूरची मूर्ती मुंबई, कर्नाटकासह यंदा लंडनलाही पाठविण्यात आल्या आहेत. वॉटर प्रुफ कलर अशा ऑइल पेंटमध्ये आकर्षकपणे सजावट केलेल्या लाल बागचा राजाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. कमीतकमी ३५० रुपयांपासून मूर्तींच्या किंमती आहेत. सर्वाधिक १ लाख ७५ हजार किमतीची मूर्ती बंगळूर येथे पाठविल्याची माहिती मूर्तिकार अंबादास गंजेली यांनी दिली.