तात्या लांडगे
सोलापूर : ‘‘डीजेमुक्त सोलापूर’ साकारण्यासाठी शहरातील २५ ज्येष्ठ नागरिक संघ व शिखर समितीचे पदाधिकारी सरसावले आहेत. या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२०) शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेतला. भर पावसात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी ‘डीजे’चा राक्षसाला गाडण्याचा निर्धार केला आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती व शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळ कार्यालयात डीजे मुक्त सोलापूरसाठी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी सकाळचे सहयोगी संपादक सिध्दाराम पाटील, शिखर समितीचे अध्यक्ष प्रा. विलास मोरे, पदाधिकारी गुरुलिंग कल्लूरकर, बाळासाहेब पाटील, डीजेच्या समस्येच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मते मांडली. डीजेच्या मिरवणुकीनंतर अनेकांना केवळ बहिरेपण येते हे खरे आहे. पण काही जणाचा अनाहुत कारणाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. डीजेच्या आवाजाने तरुणांचे मानसिक संतुलन बिघडते. ते सावरले जात नाही. हा तरुण कुटुंबातही चांगला वागत नाही. तरुण पिढी आपण डीजेच्या राक्षसाच्या हाती जात असताना आपण कोणीही हे पाहू शकणार नाही.
डीजे लावण्यासाठी कोणीही मंडळांना आर्थिक पाठबळ देऊ नये. उलट डीजे लावणार नाही या अटीवर प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यायला हवी. ही समाजाची समस्या आहे ती सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकासमवेत प्रत्येक जागरुक नागरिकांनी पुढे यायला हवे. पोलिसांना कारवाईचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषण नियम २००० मध्ये तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करायला व्हायलाच पाहिजे. बाजारपेठेत राहणाऱ्या लोकांना डीजेच्या आवाजाने घरात राहणे असह्य झाले आहे. शहरात दीडशेपेक्षा अधिक मिरवणुका निघतात मग सहनशक्तीचा अंत होतो हे समजायला हवे, अशी व्यथा त्यांनी मांडली.
मोर्चासंदर्भातील ठळक बाबी...
२५ ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची असणार उपस्थिती
ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती पदाधिकाऱ्यांची राहील प्रमुख उपस्थिती
परंपरेचा मान राखताना सामाजिक भान राखून निघणार मोर्चा
मोर्चा सर्व वयोगटातील तरुण, विद्यार्थी, महिला व नागरिकांसाठी खुला असेल
डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या अभिनंदनाचा ठराव
असा निघेल मोर्चा
बुधवारी (ता.२०) सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक एकत्र येतील. तेथून सर्व लोक शिस्तीने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जातील. तेथे मोर्चकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला 'डीजेमुक्त सोलापूर करावे', या मागणीचे निवेदन दिले जाईल.
‘या’ संघ व संघटनांचा सहभाग
ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती, साक्षेप संघ, द्वारकाधीश संघ, जागृती संघ, समर्थ संघ, विरंगुळा संघ, सानेगुरुजी कथामाला, वृत्तपत्र वाचक मंच, सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ, नंदनवन ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पेन्शनर असोसिएशन, निवृत्त पोलिस संघटना, मराठा सेवा संघ.