आळेफाटा, ता. १८ : नारायणगाव आगाराची साकोरी-पुणे एसटी बस वारंवार मागणी करूनही सुरू होत नसल्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा आळेफाटा परिसरातील प्रवाशांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी दिला आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) आगाराची साकोरी -पुणे ही एसटी बस बेल्हा-आळेफाटा मार्गे पुणे या ठिकाणी दररोज ये-जा करत असते. या मार्गावरील दहा ते बारा गावांतील नागरिकांकडून या सेवेचा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना देखील ही बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजनेचा नारायणगाव आगाराच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना एसटी पास दिलेले आहेत; परंतु शाळा सुरू होऊन दोन-तीन महिने झालेले असताना देखील नारायणगाव आगाराकडून साकोरी परिसरात एसटी बस सुरू करण्यात आलेली नाही तरी या परिसरात लवकरात लवकर बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.