गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघातांचे सत्र वाढताना दिसत आहे. त्यातच आता चिपळूण-कराड महामार्गावरील पिंपळी गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. यात चार प्रवासी आणि थार जीप चालकाचा मृतांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण कराड महामार्गावर रात्री उशिरा एक थार जीप अत्यंत वेगाने येत होती. मात्र वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या जीपने समोरुन येणाऱ्या एका रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा पूर्णपणे उद्धवस्त झाली. त्यानंतर थार जीपने एका ट्रकलाही धडक दिली. या अपघातात रिक्षातील चार प्रवासी आणि थार जीपचा चालक असे एकूण पाच जण जागीच ठार झाले.
या मृतांमध्ये पिंपळी गावातील नूरानी मोहल्ला येथील चार नागरिकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच चिपळूणचे डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक त्यांच्या टीमसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांना शवविच्छेदनासाठी चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
पिंपळी गावात शोककळाया अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती, परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती हाताळल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. एकाच गावातील चार नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने पिंपळी गावात शोककळा पसरली आहे. पोलीस अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.
वडाळ्यात मायलेकाचा मृत्यूतर दुसरीकडे मुंबईतील वडाळा चर्च परिसरात सोमवारी दुपारी एका बेस्ट बसने दिलेल्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाला. भरणी नाका येथे जाणाऱ्या बस क्रमांक १७४ ने टॅक्सीची वाट पाहत उभ्या असलेल्या लिओबो सेल्वराज (३८) आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अँथनी सेल्वराज यांना धडक दिली. हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाने ब्रेक नादुरुस्त झाल्याचे कारण दिले आहे. पोलिसांनी बसचालक बाबू शिवाजी नागेनपेणे (४०) याला ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेनंतर भाडेतत्त्वावरील बेस्ट बसमुळे झालेला हा दुसरा प्राणघातक अपघात आहे, ज्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.