नागरी बांधकाम कंपनीला इंदौर मनपाकडून मिळाला तब्बल 1,073 कोटींचा प्रकल्प; शेअर्समध्ये तेजी
ET Marathi August 19, 2025 07:45 PM
मुंबई : SPML Infra Ltd या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने इंदौरमध्ये 1,073 कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प मिळवला आहे. हा प्रकल्प AMRUT 2.0 योजनेअंतर्गत इंदौर महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे. यामध्ये 10 वर्षांची ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M) जबाबदारीही कंपनीकडेच असेल.



या प्रकल्पांतर्गत 1,650 एमएलडी क्षमतेच्या इंटेक सिस्टीम आणि रॉ वॉटर पंप हाऊसची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय 400 MLD क्षमतेचा आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प (Water Treatment Plant), 22 किमी लांबीच्या ट्रान्समिशन पाइपलाइन (1,200 mm ते 2,337 mm व्यासाच्या), आणि 132/33 kV क्षमतेचा सबस्टेशन देखील उभारण्यात येणार आहे.



एसपीएमएल इन्फ्रा लिमिटेडचे चेअरमन सुभाष सेठी यांनी सांगितले की, हा प्रकल्प इंदौरच्या जलसंपत्ती विकासाला गती देईल आणि कंपनीच्या जागतिक दर्जाच्या प्रकल्प कार्यक्षमतेचे उदाहरण आहे.



शेअर्समध्ये तेजीया घडामोडीनंतर कंपनीचे शेअर्स एनएसईवर 3% नी वधारून 309.90 रुपयांच्या दिवसातील उच्चांकावर पोहोचले होते. मात्र नंतर विक्री दबावामुळे शेअर किंमत घसरून 297.45 रुपये झाली. बीएसईवरही शेअरने 5% पर्यंत उसळी घेत 315 रुपयांपर्यंत मजल मारली होती, जे की 52 आठवड्यांच्या उच्चांक 321.70 रुपयांच्या अगदी जवळ आहे.



एसपीएमएल इन्फ्राच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत 70% आणि एका वर्षात 37% इतका परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या 5 वर्षांत या शेअरने तब्बल 2899% परतावा दिला आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांसाठी हा मल्टीबॅगर ठरला आहे. याआधी, गेल्या महिन्यात कंपनीला राजस्थानमधील अजमेरमध्ये 385 कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प मिळाला होता.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.