रितेश देशमुखला असं सांगायची हिम्मत आहे? 'गाढवाचं लग्न' मधील गंगीचा थेट प्रश्न; म्हणाली, 'ते लोक मला बोलले की तू तर...
esakal August 19, 2025 09:45 PM

२००७ साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या चित्रपटाने तेव्हा धुराळा उडवून दिला होता. या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा तितकाच आवडता आहे. आज इतक्या वर्षांनीदेखील या चित्रपटातील कलाकार आणि कथानक प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलंय. यातील डायलॉग तर चाहत्यांना तोंडपाठ आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे हिने त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगीची भूमिका साकारली होती. मात्र प्रेक्षकांना भावलेली ही गंगी अचानक कुठेतरी गायब झाली. आपल्याला इंडस्ट्रीतल्या ग्रुपनेच बाजूला केलं अशी खंत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.

राजश्री लांडगे ही राजकारणी कर्मवीर मारुतीराव लांडगे यांची नात आहे तर तिचे वडील पाटबंधारे खात्यात सचिव आहेत. मात्र याचाच फटका तिला इंडस्ट्रीमध्ये काम करताना बसलाय. राजश्रीने नुकतीच फिल्मी मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'मराठी सिनेइंडस्ट्रीतील ग्रुपने मला कायम बाजूला ढकललं. 'तुम्ही काय बाबा राजकीय, तुमच्याकडे जमिनी, शेती असेल... इथे आम्हाला काम करू दे, तुमचं काय?' मग हे तुम्ही रितेश देशमुखला म्हणू शकता का असं? तो माझ्याच समाजाचा आहे, ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्याचा मुलगा. रितेशपेक्षा या इंडस्ट्रीत असं कोण मोठं आहे? कोण आहे मोठं! आम्हाला त्याचं प्रचंड भूषण आहे, कशाला लाज वाटली पाहिजे?'

View this post on Instagram

A post shared by Rajshree Landge (@rajshree_landge)

ती पुढे म्हणाली, ' तुम्ही त्यांना सांगू शकता का, 'तुमच्याकडे सगळंच आहे तुम्ही कशाला इंडस्ट्रीत काम करता' त्यांचं बॅकग्राउंड कितीही मोठं असू दे. शेवटी त्यांचं वागणं, काम करणं यामुळेच ते लोकप्रिय आहेत ना. बॉलिवूडमध्ये ते फक्त मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून प्रसिद्ध आहेत का? त्यांचं चांगलं वागणं,चांगलं काम करणं हे तुम्ही काढून नाही घेऊ शकत. तसंच मी साकारलेली 'गंगी' भावली नसती, केवळ माझ्या बॅकग्राउंडमुळे मी गाजू शकले असते का? हे सगळं खोटं आहे, हा ज्याचा त्याचा स्ट्रगल आहे, तुम्ही कामावर बोला. कॅमेऱ्याला माहीत नाही की राजश्री लांडगे कोणाची मुलगी आहे, कॅमेऱ्याला दिसत नाही की रितेश देशमुख कोणाची व्यक्ती आहे त्याला फक्त अभिनय दिसतो आणि ती भूमिका दिसते.'

अभिनय बाजूला पडल्याने राजश्री सध्या राजकारण आणि समाजकारण करताना दिसते. तिला अभिनयाची आवड असूनही तिला आपली आवड जपता येत नाहीये. मात्र राजश्री प्रत्येक वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताना दिसते.

Video: 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटने पुन्हा दिला 'तो' सीन; अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक होतोय व्हायरल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.