गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत रात्रभर रिमझिम सुरु असल्याने पावसाने पहाटेपासून जोर धरला आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक विस्कळीतमुंबईतील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वेची लोकल सेवा सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाली आहे. कल्याण, दादर आणि ठाणे यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. ज्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलीतसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मिठी नदीची पातळीही वाढत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी यावर प्रशासनाचे यावर लक्ष आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूच्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे, असे सांगितले आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासन तयार आहे. त्यामुळे, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
मिठी नदी सध्या धोकादायक पातळीच्या जवळ वाहत आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. मिठी नदीने 3.20 मीटरची धोकादायक पातळी ओलांडली आहे. या पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळेच, मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारी म्हणून कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरसारख्या सखल भागांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यताहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २२ ऑगस्ट २०२५ या पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० किलोमीटर प्रतितास असेल, जो ६५ किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे समुद्र खूप खवळलेला असेल. मच्छिमारांनी त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रात अजिबात जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. या वादळी वाऱ्यांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, मच्छिमार संस्था आणि बोटींच्या मालकांना तातडीने सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच, पुढील काळातही हवामान विभागाकडून येणाऱ्या नवीन माहितीकडे लक्ष ठेवावे आणि त्याप्रमाणे काळजी घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.