पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ (टेट)’ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राज्यातील एकूण दोन लाख ११ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर, परीक्षेत व्यावसायिक अर्हता, त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि अन्य वैध प्रमाणपत्र सादर न केलेल्या जवळपास सहा हजार ३२० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर आठ दिवसांमध्ये प्रतिदिन तीन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी दोन लाख २८ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी एकूण दोन लाख ११ हजार ३०८ जणांनी परीक्षा दिली. यंदा व्यावसायिक अर्हता, त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून एका महिन्यात सादर करणे अनिवार्य होते.
यंदा बी.एड. आणि डी.एल.एड परीक्षेच्या एकूण १७ हजार ९८ विद्यार्थ्यांनी ‘टेट’साठी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यातील ‘बी.एड.’च्या एकूण नऊ हजार ९५१ आणि ‘डी.एल.एड’च्या ८२७ अशा एकूण १० हजार ७७८ विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तर, कागदपत्र जमा न करणाऱ्या उर्वरित ‘बी.एड.’च्या पाच हजार ८०५ आणि ‘डी.एल.एड’च्या ५१५ अशा एकूण सहा हजार ३२० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे.
- अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद
३१ ऑगस्टपर्यंत गुणपत्रक डाऊनलोड कराराज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची गुण यादी आणि गुणपत्रक उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक ३१ ऑगस्टपर्यंत डाऊनलोड करता येणार आहेत, असे राज्य परीक्षा परिषदेने नमूद केले आहे.