बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला पत्रकार परिषदेतून आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. टी 20i संघात जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. तसेच फक्त एक टी 20i सामन्याचा अनुभव असलेल्या गौतम गंभीर याचा लाडका हर्षित राणा याला संधी देण्यात आली आहे. हर्षितला फक्त एक टी 20i सामना खेळण्याचाच अनुभव आहे. त्यामुळे हर्षितला संधी देण्यावरुन प्रश्न करण्यात आले. हर्षितला संधी देण्यावरुन कर्णधार सूर्यकुमार यादव याने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
हर्षितला संघात संधी देण्याचं सूर्यकुमारने समर्थन केलं. हर्षितने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याचं सूर्याने म्हटलं. “मला वाटतं की हर्षित पुण्यात झालेल्या सामन्यात कन्कशन रिप्लसेमेंट म्हणून खेळला होता. आम्हाला हर्षितमधील प्रतिभेवर विश्वास आहे. तो चांगली कामगिरी करु शकतो याबाबत आम्हाला विश्वास आहे”, असं सूर्यकुमार याने म्हटलं. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सूर्याने ही प्रतिक्रिया दिली.
जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराहसोबत अर्शदीप सिंह याला संधी मिळू शकते. तर यूएईमधील संथ खेळपट्टीमुळे हर्षित राणा याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणं अवघड दिसत आहे. हर्षितने खेळलेल्या एकमेव टी 20i सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या हिशोबाने आशिया कप स्पर्धेतील सामने टी 20 फॉर्मेटने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आशिया कपपासून पुढील प्रत्येक टी 20i मालिका ही महत्त्वाची असणार आहे. भारतीय संघ या वर्ल्ड कपआधी एकूण 15 टी 20i सामने खेळणार आहे. त्यामुळे मिशन वर्ल्ड कपसाठी या 15 सामन्यांमधून भारताला अनेक गोष्टींवर सुधार करण्याला वाव असणार आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांमधील कामगिरी पाहता श्रेयस अय्यर याला आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळेल, असं म्हटलं जात होतं. मात्र तसं काही होऊ शकलं नाही. श्रेयसला संधी न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात निवड समितीबाबत रोष पाहायला मिळत आहे.