Mumbai Red Alert : सावधान… धोका वाढला, हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा, हेल्पलाईन नंबर जारी
Tv9 Marathi August 19, 2025 10:45 PM

मुंबईत रात्रभर पाऊस सुरू असून पहाटे पावसाचा जोर वाढलाय. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. आज मुंबईला रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मुंबईसह पुण्यात देखील धुवाधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये अलर्ट जारी केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की, अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलाय.

पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहोत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय. आता परत पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यांमध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. जागोजागी महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर थांबल्याचे बघाायला मिळतंय.

हिंदमाता परिसरातले पंप सुरू आहे. मुंबईतील कांदिवली मालाडमध्ये मुसळधार पाऊस आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार, वांद्रे या उपनगरांसह सर्व भागात पाऊस पडतोय. अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. मुंबई ठाणेमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वे वर काही अंशी परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

जलदलोकल 15 मिनिट उशिराने तर धिम्या लोकल 10 मिनिट उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत असून चाकरमानी वर्गांची संख्या कमी आहे. दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झालीये. सोमवारी झालेल्या पावसाने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवासी वर्गांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आज देखील पुढील 24 तास महत्वाचे असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. रात्रभर पावसाने दादरच्या स्टेशन बाहेर पाणीच पाणी साचले आहे. रस्ता झाला जलमय आहे. सोसायटीमध्ये देखील आत मध्ये पाणी शिरलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.