Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब
Saam TV August 19, 2025 11:45 PM
  • शहापूर तालुक्यातील कुटुंब नियोजन शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली.

  • ५२ महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या असून मोफत शिबिर असूनही पैसे घेतले गेले.

  • नागरिकांनी आरोग्य विभागाला जाब विचारला, डॉक्टर मात्र घटनास्थळावरून निघून गेले.

  • चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने गोरगरीब व विशेषत: आदिवासी समाजातील महिलांसाठी मोफत राबवले जाते. मात्र या शिबिरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलांकडून तब्बल तीन हजार रुपयांची वसूली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर हे शिबिर खर्डी ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले होते. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते, मात्र जागेअभावी ते खर्डी येथे हलविण्यात आले. शिबिरात एकूण ५२ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. बहुतेक महिला आदिवासी पाड्यातून इथे पोहोचल्या होत्या. सरकारी नोंदीनुसार हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे, परंतु प्रत्येक महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडून ३,००० रुपये घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

हा प्रकार खर्डी गावचे रहिवासी सागर बागुल यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच याबाबत डॉक्टरांना जाब विचारला, मात्र तोपर्यंत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ठिकाणावरून निघून गेले होते. त्यामुळे पैशांची वसूली नेमकी कोणी केली, या मागे कोणते आरोग्य कर्मचारी सामील होते, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

Shahapur : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; पाणी पुरवठा करणारे तीनही धरण ओव्हरफ्लो

गोरगरीब व आदिवासी महिलांकडून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. अनेक महिला कुटुंब नियोजनासाठी या शिबिरात सहभागी झाल्या होत्या, कारण त्यांना सरकारी शिबिर मोफत असल्याची खात्री दिली होती. मात्र, प्रत्यक्षात पैसे मागण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे मानले जात आहे.

Shahpur परिसरात पावसाला सुरुवात, पावसातही मार्गस्थ होण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

कुटुंब नियोजन शिबिरे ही शासनाची महत्त्वाची योजना असून ग्रामीण भागातील, विशेषत: आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना आरोग्य सुविधा मोफत पुरविण्यासाठीच ही शिबिरे घेतली जातात. अशा वेळी शिबिराच्या नावाखाली पैशांची वसूली करणे हा गंभीर प्रकार ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Shahpur News : निवडणुकीत भानामतीचा प्रकार ; शहापूर मधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रारींचा पाढा चालू झाला आहे. महिलांच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या अशा शस्त्रक्रियांसाठी पैसे आकारणे ही केवळ अनैतिक बाब नाही तर शासनाच्या आदेशाचा थेट भंग आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी सत्य बाहेर आणून जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.