पिंपरी : गेल्या तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, साचणारे पावसाचे पाणी आणि पायाभूत सुविधांच्या समस्या आदी कारणांमुळे हिंजवडी आयटी पार्कचा विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही तो विषय गाजला. सरकारने लक्ष घातले. ‘सकाळ’नेही पाठपुरावा केला. आता त्यावर कार्यवाही सुरू झाली असून ‘पीएमआरडीए’ने विविध रस्त्यांची आखणी करून कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या भागातील रस्त्यांची समस्या सुटून ते चकचकीत होतील, अशी चिन्हे आहेत.
जिल्हा प्रशासन, राज्य औद्योगिक विकास महामंडळ, राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अख्त्यारित हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांचा संबंध येतो. शिवाय, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना जोडणाऱ्या
रस्त्यांमुळे दोन्ही महापालिकांशी त्यांचा संबंध येतो. याशिवाय मेट्रो चे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावरही उत्तरदायित्व येते. विभागांमधील समन्वयाअभावी निर्माण झालेल्या समस्या सुटत आहेत. विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली कामे सुरू झाली आहेत. पीएमआरडीएच्या सुचनेनुसार मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यांचे काम होत आहे.
असे रस्ते, असे मुहूर्तहिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही भागांत अतिक्रमणे काढण्याचीही कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तेथील रस्तेही दुरुस्त केले जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रस्त्यांसाठी सर्वेक्षण सुरू आहे. नवीन रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने पीएमआरडीएने थेट खरेदी, संमतीने खरेदी, ‘टीडीआर’ आणि ‘इन्सेटिव्ह एफएसआय’ आदींबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी आणि पिरंगुट औद्योगिक क्षेत्रांतील प्रत्येकी तीन अशा सहा रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. हे रस्ते झाल्यानंतर या ठिकाणी काम करणाऱ्या आणि स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
म्हाळुंगे ते हिंजवडी फेज एक या दरम्यानचा दीड किलोमीटरचा ३६ मीटर रुंद; ठाकर वस्ती ते माण २.४० किलोमीटरचा १८ मीटर रुंद आणि सूर्या रुग्णालय ते ठाकर वस्ती या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचेही काम सुरू केले आहे.
उरवडे ते हिंजवडी फेज तीन हा ७.१० किलोमीटर लांब व ४५ मीटर रुंद रस्ता; नांदे ते लवळे ३.९३ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद रस्ता आणि नांदे ते माण या नवीन दीड किलोमीटर रस्ताही हाती घेतला आहे.