सर्वोदय छात्रालयाचे काम आजही उठून दिसणारे
esakal August 20, 2025 08:45 AM

-rat१९p३.jpg-
P२५N८५४५७
रत्नागिरी : मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर जयंती कार्यक्रमात शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांसमवेत पुढे बसलेले डॉ. सदानंद आग्रे, हरिश्चंद्र गीते, अॅड. संदीप ढवळ, गजानन चाळके आदी.
-------
सर्वोदय छायात्रालयाचे काम उल्लेखनीय
डॉ. सदानंद आग्रे ः बाळासाहेब खेर यांचा जयंतीदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : सर्वोदय छात्रालयाने आतापर्यंत १६०० विद्यार्थ्यांना घडवले. ते सर्वोदयाचा विचार सर्वत्र पेरत आहेत. विद्यार्थ्यांनी घडताना बाळासाहेब खेर, अप्पासाहेब पटवर्धन आणि अनेक महान नेत्यांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यातून विचार करा, कृती करा. पूर्वीच्या काळातही समता नव्हती व ती आजही नाही. समाजामध्ये विषमतेच्या पाली चिकटलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत सर्वोदय छात्रालयाचे काम आजही उठून दिसणार आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद आग्रे यांनी केले.
(कै.) बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन हा संस्थेच्यावतीने कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, विद्यमान अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके उपस्थित होते.
व्यवस्था समितीच्या सदस्य वीणा काजरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यमुनाबाई खेर ट्रस्टचे संस्थापक बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन हा संस्थेच्यावतीने कृतज्ञता दिवस म्हणून साजरा होत असल्याबद्दलची माहिती अॅड. ढवळ यांनी दिली. ट्रस्टचे माजी अध्यक्ष गीते यांनी आजचा दिवस म्हणजे फक्त भाषण ऐकायचा नाही तर भाषण ऐकून विचार करायचा, चिंतन करायचे व कृती करायचा आहे, असे सांगितले.

चौकट १
आदर्श छात्र पुरस्कार, शिष्यवृत्ती
यावर्षीचा बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार प्रथमेश लांबे याला देण्यात आला. (कै.) मोरोपंत जोशी व (कै.) सौ. सरस्वती जोशी तात्या-ताई शिष्यवृत्ती मयूर सुर्वे, (कै.) राजाराम पांगम शिष्यवृत्ती विशाल लटके याला देण्यात आली. (कै.) हेमलता गीते शिष्यवृत्ती विभागून विराज कोतवडेकर व दिगंबर रहाटे याला, (कै.) पद्मजा व (कै.) विष्णू बर्वे शिष्यवृत्ती विपुल धडम, (कै.) शैलजा रमेश भाटकर शिष्यवृत्ती विभागून प्रीत पावसकर व सुजल जोगळे याला देण्यात आली.

चौकट २
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री एकच
बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना शिक्षणाविषयी तळमळ असल्यानेच त्यांनी शिक्षणखाते स्वतःकडे ठेवले. शिक्षणखाते स्वतःकडे ठेवणारे ते हिंदुस्थानातील एकमेव मुख्यमंत्री असावेत. आपल्या पश्चात मूळ गावातली संपूर्ण जमीन समाजासाठी ट्रस्टला दान करणे हे विलक्षण आहे, असे डॉ. आग्रे म्हणाले.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.