माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात स्वस्त धान्यापासून पावणेतीन लाख कुटुंबे राहणार वंचित'; ई-केवायसी अपूर्णचा परिणाम
esakal August 20, 2025 06:45 AM

-उमेश बांबरे

सातारा : शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक केलेले असतानाही जिल्ह्यात ८४.७६ टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन लाख ७१ हजार ९२५ शिधापत्रिकाधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ लाख ८४ हजार ३१० शिधापत्रिकांपैकी केवळ १५ लाख १२ हजार ३८५ शिधापत्रिकाधारकांचेच ई-केवायसी पूर्ण झाले आहे. केवायसी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावणेतीन लाख कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Farming Success Story : 'अवघ्या ५५ गुंठ्यात २३ लाखांचे डाळिंब'; व्होळे येथील सुधाकर चोपडेंनी कष्टातून फुलवली शेती, बांगलादेशात निर्यात

ई-केवायसीच्या माध्यमातून खऱ्या शिधापत्रिकाधारकांची ओळख स्पष्ट होणार आहे. त्यातून चुकीच्या लाभार्थ्यांना जाणारे अनावश्यक स्वस्तातील धान्य रोखले जाणार आहे. खऱ्या लाभार्थी या धान्यापासून वंचित राहू शकणार नाही. त्यासाठी शासनाने सर्व शिधापत्रिकांची ई-केवायसी करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४.७६ टक्के म्हणजे १५ लाख १२ हजारांवर शिधापत्रिकांचे ई केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित पावणेतीन लाख शिधापत्रिकधारकांनी ई केवायसीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्याला विविध कारणेही जबाबदार आहेत.

ई-केवायसीमध्ये तालुकानिहाय स्थिती पाहता माण ८८.२५, खंडाळा ८६.४९ आणि जावळी ८६.६९ टक्के पूर्ण झाली असून, या तालुक्यात तुलनेने समाधानकारक कामगिरी झाली आहे; परंतु कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५१ हजारांहून अधिक शिधापत्रिका प्रलंबित आहेत. साताऱ्यात ४३ हजार, पाटणमध्ये ३७ हजार, तर फलटणमध्ये तब्बल ३३ हजार धारकांची प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे दिसून येते.

फलटण तालुक्याची टक्केवारी सर्वांत कमी म्हणजे ८१.०६ टक्क्यांवर आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शासनाकडून धान्य वाटप बंद होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी तातडीने ई-केवायसी करून घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी स्पष्ट केले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिकाधारकांनी या प्रक्रियेबाबत उदासीनता दाखविल्याचे लक्षात येते. ही उदासीनता कायम राहिली, तर हजारो कुटुंबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

Solapur News:'सोलापुरातील प्रधानमंत्री पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ'; मुदतवाढीनंतरही केवळ तीन लाख २९ हजार २५६ अर्ज अशी आहे स्थिती...
  • एकूण शिधापत्रिका : १७,८४,३१०

  • ई-केवायसी नामंजूर ३७,०६७

  • एसआय लॉगीन अपूर्ण ५,१८,३१९

  • प्रलंबित ई-केवायसी २,७१,९२५

  • केवायसी पूर्ण झालेल्या १५,१२,३८५

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.