Nashik News : नाशिकच्या रस्त्यांची रुंदी वाढणार; एनएमआरडीचा महत्त्वपूर्ण निर्णय
esakal August 20, 2025 12:45 PM

नाशिक: समृद्धी महामार्गासह प्रस्तावित ड्रायपोर्ट, आयटी पार्क, वाढते औद्योगीकरण, लॉजिस्टीक पार्क, ओझर विमानतळाचा विस्तार व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) शहराला जोडणाऱ्या पोच रस्त्यांची किमान रुंदी पंधरा मीटर अनिवार्य केली आहे. भौगोलिक अडथळे असलेल्या रस्त्यांची रुंदी बारा मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवेदन जाहीर केले आहे.

नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरात वाढती वाहतूक लक्षात घेऊन बाह्यवळण रोडलादेखील मान्यता दिली आहे. समृद्धी व सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग तसेच वाढवण बंदर ते इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाला भरविर येथे जोडणारा ११८ किलोमीटर महामार्ग तयार केला जाणार आहे. आयटी पार्क, ड्रायपोर्ट, लॉजिस्टीक पार्कमुळे वाहतूक वाढणार आहे. विकासाच्या या बाबी लक्षात घेता नाशिक महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या अर्थात एनएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढणार आहे.

त्यामुळे रस्त्यांवरील वाढता ताण लक्षात घेऊन निवासी, व्यावसायिक किंवा अन्य प्रकारच्या मालमत्तांचा विकास करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. यापुढे ठरवून दिलेल्या नियमानुसारच ले-आऊटला परवानगी देवून त्या दृष्टीने तेवढ्या प्रमाणात जागा सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. एनएमआरडीएने यापूर्वी रस्ता रुंदीकरणात बदल केले. त्यात ग्रामीण मार्ग १५ मीटरवरून १८ मीटर, इतर जिल्हा मार्ग १८ मीटरवरून २४ मीटर, प्रमुख जिल्हा मार्ग २४ मीटरवरून ३० मीटर करण्यात आले आहे. आता ले-आउट करताना प्रमुख रस्त्यांना जोडणारे रस्ते पंधरा मीटर बंधनकारक करण्यात आले आहे.

काय म्हटलंय नवीन आदेशात?

प्राधिकरणाकडे विकास परवानगीसाठी प्राप्त होणाऱ्या बहुतांश प्रस्तावाखालील जागांस, नजीकच्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या जागांतून संबंधित जागा मालकांच्या संमतीने पोच रस्ता उपलब्ध करून घेण्यात येतो. प्रचलित एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० मधील तरतुदींनुसार आवश्यक उपलब्ध पोच रस्त्याच्या रुंदीनुसार प्रस्तावाधिन जागेत विकास परवानगी दिली जाते.

Nashik News : नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना फटका; पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

त्याअनुषंगाने भविष्यातील मोठ्या रुंदीच्या रस्त्यांची आवश्यकता विचारात घेता, पोच रस्त्यांची किमान रुंदी पंधरा मीटर अनिवार्य आहे. अपरिहार्य भौतिक किंवा भौगोलिक अडथळे जसे की, नदी, धरणे, डोंगर आदीबाबत महानगर आयुक्तांच्या पूर्व मान्यतेने किमान १२ मीटर रुंदीचा पोच रस्ता संमतीने घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ यांच्या स्वाक्षरीने दोन दिवसांपूर्वी आदेश काढण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.