सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे वातावरणात गारवा, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवते. पावसाळ्यात रोगराई पसरण्यासोबतच कपडे ओले राहतात.
यामुळे पावसाळ्यात ओले कपडे सुकवणे हे एक मोठे आव्हान असते. कपडे ओले राहिल्याने त्यांना कधीकधी दुर्गंधी येते. अशा वेळी, काही सोप्या उपायांनी तुम्ही कपडे लवकर सुकवू शकता.
कपडे लवकर सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनच्या स्पिन ड्रायरचा पुरेपूर वापर करा. कपडे जास्त वेळ स्पिन केल्याने त्यातील जास्तीत जास्त पाणी निघून जाते. यामुळे स्पिन केलेले कपडे घरातच हवेवर वाळत घातले तर ते सुकण्यासाठी कमी वेळ लागतो. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर कपडे पिळून झाल्यावर ते कोरड्या टॉवेलमध्ये गुंडाळा आणि मग पिळा, जेणेकरून टॉवेल अतिरिक्त पाणी शोषून घेईल.
कपडे वाळत घालताना ती जागा हवेशीर असणं गरजेचे आहे. कपडे खिडकीजवळ, बाल्कनीमध्ये किंवा घरात जिथे हवा खेळती असेल अशा ठिकाणी ठेवा. तसेच पावसाळ्यात पंख्याखाली कपडे वाळत घाला. यामुळे ते लवकर सुकतात आणि त्यांना दुर्गंधीही येत नाही.
लहान कपडे, जसे की रुमाल, मोजे किंवा अंतर्वस्त्रे हे लवकर सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. हेअर ड्रायर कमी तापमानावर ठेवून तो कपड्यांवर फिरवा. तसेच ओले कपडे तुम्हाला इस्त्रीने वाळवता येतात. यासाठी, कपड्यांवर एक कोरडे कापड ठेवून त्यावर इस्त्री फिरवा. जेणेकरुन कपडे जळणार नाहीत.
कपडे लवकर सुकण्यासाठी ते एकमेकांना चिकटून न ठेवता त्यांच्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा. यामुळे हवा प्रत्येक कपड्याच्या आतून खेळती राहते आणि ते लवकर कोरडे होतात. ओल्या कपड्यांजवळ डिह्युमिडिफायर ठेवल्यास ते हवेतील ओलावा शोषून घेते, ज्यामुळे कपडे लवकर सुकतात. जर तुमच्याकडे डिह्युमिडिफायर नसेल, तर रूम हीटर वापरून खोलीतील आर्द्रता कमी करता येते.
पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी धुताना पाण्यात एक चमचा व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा टाका. यामुळे कपडे स्वच्छ राहतात. त्यांना एक ताजेतवाने सुगंध येतो. कपडे सुकल्यानंतर लगेचच कपाटात न ठेवता त्यांना पूर्णपणे सुकू द्या.
कपडे लवकर सुकवण्यासाठी एकाच वेळी खूप जास्त कपडे धुऊ नका. काही कपडे धुतल्यानंतर ते पूर्णपणे सुकल्यावरच बाकीचे कपडे धुवा. यामुळे प्रत्येक कपड्याला सुकण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.