Solapur Ashram School : धक्कादायक! 'साेलापुरातील आश्रमशाळेत ना किचन, ना जेवणाची सुविधा'; मुख्याध्यापक निलंबित, सापळे शाळेवर प्रशासक..
esakal August 20, 2025 11:45 PM

सोलापूर: ‘ना जेवणाची सुविधा, ना किचनची सोय, शिक्षण घेण्यासाठी ना इमारत, ना राहण्यासाठी वसतिगृह अशा वातावरणात मुले शिक्षण घेत असतील कसे’, ही वाक्यं आहेत विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांची. असुविधांबद्दल समिती सदस्यांनी तीव्र नाराजी करत कोन्हाळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम हडपद यांना जागेवरच निलंबित करून आदेशाची प्रत देण्यात आली. सापळेच्या आश्रमशाळेतील गैरसोयीबद्दल शाळेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला.

कऱ्हाड हादरलं! 'महाविद्यालयीन युवतीचे अपहरण'; प्राचार्यांकडून तक्रार, युवती मैत्रिणींसोबत चालत निघाली अन्..

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा सोलापूर दौऱ्यात पहिल्याच दिवशी अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील कै. परशुराम जाधव आश्रमशाळेस भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुविधा मिळत असल्याचे दिसून आले. शाळेच्या मुख्याध्यापकास निलंबित करून शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. सापळेच्या आश्रमशाळा सात वर्षांपासून वसतिगृहासाठी अनुदान उचलण्यात येते पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सुविधा पुरवली जात नाही. यामुळे या शाळेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव पुणे कार्यालयास पाठवण्यात आल्याचे कांदे यांनी सांगितले.

बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३ ते ५ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, प्रादेशिक परिवहन कार्यालय, औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण, कृषी अधीक्षक कार्यालय, पशुसंवर्धन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळी १० ते २ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जात पडताळणी समिती तसेच जिल्हा परिषद या ठिकाणची आढावा बैठक होईल. दुपारी ३ ते ४.३० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीने विविध प्रकल्प व कामांच्या केलेल्या पाहणी दरम्यान समितीच्या निदर्शनास आलेल्या काही प्रमुख बाबींसंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार आहे.

समितीमध्ये या सदस्यांचा सहभाग

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा सोलापूर दौरा २१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या समितीचे प्रमुख अध्यक्ष आमदार सुहास कांदे असून, समितीचे सदस्य आमदार रत्नाकर माणिकराव गुट्टे, कीर्तिकुमार भांगडिया, उमेश यावलकर, देवेंद्र कोठे, शंकर जगताप, संतोष बांगर, राजू कारेमोरे, मनोज कायंदे, प्रवीण स्वामी, अनिल मांगुळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, सचिन अहीर.

साेलापुरात राजकीय हस्तक्षेप नसेल तर तासात ‘डीजेमुक्त’ करू; पोलिसांची ग्वाही, आमदार, मंत्र्यांचा दबाव नकाे

बुधवारी जिल्ह्यातील शाळांची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यांची एक समिती करणार आहोत. पाहणीस वेळ असल्याने एका तालुक्यात दोन सदस्यांची समिती पाहणी करणार आहे. शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचण्यासाठी मोठा निधी दिला जातो, पण प्रत्यक्षात हा निधी गरजूंपर्यंत पोचत नाही. यामध्ये ज्या शाळा, अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

- सुहास कांदे, अध्यक्ष, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.