महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाच्या मुद्यावर नेहमी ते आक्रमक भूमिका मांडतात. आता महाराष्ट्र सरकारमधील मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
“हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव (भगवान) तिसरा अवतार मानले जातात. या वसुंधरेचा वराह देव संवर्धक व रक्षक आहे. सर्व प्रकारच्या दृष्टप्रवृत्तीचा नाश करणारा आहे. 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती येत आहे. या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतीक महत्त्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनाने समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते” असं नितेश राणे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
अशी जनतेची अपेक्षा
“वराह जयंती बद्दल हिंदू समाजात मोठा आदरभाव आहे. राज्यभर ही जयंती अधिकृतरित्या साजरी व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे. शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतीक उपक्रम तसेच पूजा-अर्चा आयोजित केली जावी. यासाठी योग्य ती अधिसूचना द्यावी अशी आपणास विनंती करत आहे” असं नितेश राणे यांनी पत्रात लिहिलं आहे.
नितेश राणे यांच्या मागण्या काय?
25 ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिवस म्हणून घोषित करावा.
शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृती व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.
शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाचा इतिहास व संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत.
मंदिरामध्ये पूजा-अर्चा व विशेष भक्तीचे आयोजन करण्यात यावे, अशा मागण्या नितेश राणे यांनी केल्या आहेत.