CM Rekha Gupta : मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, रेखा गुप्ता यांच्या जनता दरबारात घडलं काय? सरकारी बंगल्यावर एकच धावपळ
Tv9 Marathi August 21, 2025 12:45 AM

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांच्या सरकारी बंगल्यावर जनता दरबार सुरू होता. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. काही वृत्तानुसार, हल्लेखोराने त्यांच्यावर दगड भिरकावला. तर काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा व्यक्तीने अचानक आरडाओरड सुरू केली आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांवर धावून गेला. त्याने जोरात चापट मारली. त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने हा प्रकार का केला, याविषयीची चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुधवारी जनता दरबार भरवण्यात आला होता. या दरम्यान एक व्यक्ती आला. त्याने आरडाओरड सुरू केली आणि तो मुख्यमंत्र्यांकडे धावून गेला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना धक्काबुक्की केली. त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली. त्यांना चापट मारण्याचा प्रयत्न केला. ही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे मानण्यात येत आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी आज बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अनेक नागरिक तक्रार आणि समस्या घेऊन दाखल झाले होते. तेव्हा हल्लेखोर सुद्धा तक्रार देण्यासाठी जनता दरबारात हजर झाला. त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली. तो जोरजोराने आरडाओरड करू लागला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गडबडून गेले. पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेतले. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते प्रविण शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता दरबारात तक्रार देण्याच्या बहाण्याने हा तरुण सीएम गुप्ता यांच्या जवळ पोहचला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्र दिली. मग तो आरडाओरड करू लागला आणि त्याने गुप्ता यांना चापट मारली.

लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल-वीरेंद्र सचदेवा

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. हा प्रकार अचानक झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने हा प्रकार का केला याची संपूर्ण माहिती लवकरच समोर येईल असे सचदेवा म्हणाले.

काँग्रेसने घटनेचा केला निषेध

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. मुख्यमंत्री या संपूर्ण दिल्लीचे प्रतिनिधीत्व करतात. या घटनेने महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे ते म्हणाले. जर मुख्यमंत्रीच सुरक्षित नाही तर सामान्य महिला दिल्लीत कशी सुरक्षित असेल असा सवाल त्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.