सकाळ इम्पॅक्ट
रावेत, ता. २० ः अनेक महिन्यांपासून डॉक्टरांच्या अभावामुळे ठप्प झालेल्या मुकाईनगर येथील जिजाऊ क्लिनिक व नागरी आरोग्य विभागाचे केंद्र अखेर सुरू झाले आहे. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महानगरपालिकेने तत्काळ पावले उचलत डॉ. अविना सेलवन यांची येथे कायमस्वरूपी पूर्णवेळ डॉक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.
रावेत परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत होता. मात्र, आता जिजाऊ क्लिनिक पुन्हा कार्यरत झाल्यामुळे नागरिकांना विनामूल्य व तत्काळ उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केल्याने प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. आता औषधोपचार व आरोग्य तपासणीसाठी भटकंती करावी लागणार नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे.
जिजाऊ क्लिनिक व नागरी आरोग्य विभागाच्या मुकाईनगरसह सर्व केंद्रांना पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. सध्याला १४ ठिकाणी जिजाऊ आरोग्य केंद्रे सुरू आहेत. भविष्यात महापालिका हद्दीत ७० ठिकाणी अशी आरोग्य केंद्रे सुरू करायची आहेत. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरुन नागरिकांना सातत्यपूर्ण आरोग्यसेवा मिळेल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका